मंगळवारी (18 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेटविश्वात अनेक हालचाली दिसल्या. त्याचे परिणाम जागतिक क्रिकेटविश्वावरही झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात आले. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष झाले आहेत. मुंबईमध्ये झालेल्या या चर्चासत्रात अनेक निर्णय घेतले गेले. त्यातील महत्वाचा निर्णय ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटलाही त्याची झळ पोहोचणार आहे.
आशिया चषक (Asia Cup) 2023 या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. आता त्यांचे हे यजमानपद बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे धोक्यात आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्रामच्यानुसार आशिया चषकाचा पुढील हंगाम पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामुळे भारत पाकिस्तानला जाणार अशा चर्चांना पेव फुटले होते, मात्र आशिया क्रिकेट काउंसिलचे (एसीसी) अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारत 2023च्या विश्वचषकासाठी पाकिस्तानला नाही जाणार हे स्पष्ट केले आहे.
शहा म्हणाले, “आशिया चषकाबाबत आम्ही निर्णय घेतला असून भारत पाकिस्तानला जाणार नाही. त्या स्पर्धेसाठी आम्ही एक वेगळे ठिकाण निश्चित केलेले आहे. आमच्या संघाने पाकिस्तानचा दौरा करावा का नाही हे सरकार ठरवते. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही पण 2023चा आशिया चषक दुसरीकडे तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
भारतीय पुरूष क्रिकेट संघाने 2008नंतर पाकिस्तानचा दौरा केला नाही. 2008च्या आशिया चषकासाठी भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. या दोन्ही संघामधील राजकीय संबंध बिघडल्याने द्विपक्षीय मालिका देखील खेळली जात नाही. अशात हे दोन्ही संघ आशिया क्रिकेट आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्येच समोरासमोर येतात.
ऑस्ट्रेलियात पुरूषांचा टी20 विश्वचषक सुरू आहे. या आठव्या हंगामात भारत आणि पाकिस्तान एकाच सुपर 12च्या गटात सामील आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे आमनेसामने येणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलगा क्रिकेटर, तर सुन जगप्रसिद्ध स्पोर्ट्स होस्ट, असा आहे बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा परिवार
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले रॉजर बिन्नी पाचवेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर! गांगुलीसह ‘या’ तिघांनी भुषविलंय पद






