2008 सालापासून भारतीय क्रिकेट संघाने कधीही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तसेच, 2012-13 मध्ये पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका (Bilateral Series) खेळली गेलेली नाही. अलीकडेच टी20 वर्ल्ड कप 2026 बाबत मोठा वाद निर्माण झाला होता, जिथे बांगलादेशने त्यांचे सामने बदलण्याची मागणी केली होती आणि पाकिस्तानने त्याला पाठिंबा दिला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील केवळ क्रिकेटचेच नव्हे तर राजकीय संबंधही अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहेत. या सर्वांच्या दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होणे शक्य आहे का आणि दोन्ही संघ पुन्हा एकमेकांच्या देशाचा दौरा सुरू करू शकतील का? बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रश्नाचे स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिले आहे.
न्यूज एजन्सी एएनआयशी (ANI) बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत आमचे धोरण असे आहे की, सरकार जो काही आदेश देईल, त्याचे आम्ही पालन करू. आयसीसीनेही (ICC) हे स्पष्ट केले आहे की, जर सरकार एखाद्या देशाबद्दल काही भूमिका घेत असेल, तर क्रिकेट बोर्ड त्याचे पालन करेल. त्याचप्रमाणे या प्रकरणातही सरकारच्या आदेशाचे पालन केले जाईल. मला वाटत नाही की सध्याच्या काळात भारत आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय दौरे शक्य आहेत.”
राजीव शुक्ला यांनी भारत सरकारच्या त्या धोरणाचा पुनरुच्चार केला, ज्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान सामने ‘न्यूट्रल वेन्यू’वर (तटस्थ ठिकाणी) खेळवले जातील. गेल्या वर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते, या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतही ‘हायब्रीड मॉडेल’चा अवलंब केला जाईल, त्यामुळे पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होतील.






