अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणेच कुस्तीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार की नाही याबाबद अनेकांना प्रश्न पडला होता. पण ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद उत्सुक आहेत. या स्पर्धेबाबत २० नोव्हेंबरला पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या कार्यकारणी सभेत चर्चा झाली आहे. ही स्पर्धा पुढीवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्यानुसार कोरोना व्हायरसमुळे बंद असलेल्या सर्व राज्य स्पर्धा सुरळीत सुरु व्हाव्यात यासाठी भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडेही विनंती केली असून ते स्वत: केंद्र आणि राज्य शासनाकडे शिफारस करणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून स्पर्धा सुरु करण्याच्या सूचना आल्यानंतरच त्यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार स्पर्धा घेण्यात येतील, असे परिषदेचे सरचिटणीस श्री बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेची वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली असून आगामी स्पर्धांच्या सर्व प्रवेशिका १०-१५ दिवस आधीच ऑनलाईन स्विकारल्या जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंनी दिलेल्या माहितीची आधीच तपासणी होईल आणि स्पर्धेवेळी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी प्रत्येक शहर व जिल्हा तालिम संघात त्यांनी सुचविलेल्या १ बेवसाईट मॅनेजर आणि २ सोशल मीडिया प्रतिनिधींची नियुक्ती परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या वतीने वर्षाअखेरीस महाराष्ट्रातील गुणवंत कुस्तीपटूंचा गुणगौरव पुरस्कार सोहळाही आयोजित करण्यात येईल. हा सोहळा पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्तीसंकुलात होईल.
याबरोबरच ऑलिंपिक पदक विजेते खशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदने भारतीय कुस्ती महासंघामार्फन केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
वाचा –
-अशी आहे महाराष्ट्र केसरी २०२०ची विजेतेपदाची गदा
-संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी