टेनिस चाहत्यांसाठी आजपासून ग्रास कोर्टवरील राजेशाही खेळाची पर्वणी सुरू होणार आहे. कारण टेनिस जगतात सगळ्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमला आजपासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पण यंदा मात्र सगळे नियम पाळून मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर अव्वल टेनिसपटूंमधील घमासान चाहत्यांना पाहायला मिळेल.
यंदाच्या विम्बल्डनपूर्वी आलेली सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे ग्रास कोर्टचा बादशहा रॉजर फेडररचे पुनरागमन. फेडररने फिटनेसच्या कारणामुळे मागील काही स्पर्धांमधून माघार घेणे पसंत केले होते. मात्र आपल्या सगळ्यात लाडक्या स्पर्धेतून टेनिस कोर्टवर परतण्यासाठी तो सज्ज झाला आहे. ३९ वर्षीय फेडरर यंदा आपले विक्रमी एकविसावे ग्रँडस्लॅम पटकावण्याचा प्रयत्न करेल.
मात्र त्याच्या वाटेतील सगळ्यात मोठा अडथळा असेल तो सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा. जोकोविचने नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅममध्ये लाल मातीवरची राफेल नदालची मक्तेदारी मोडून काढत विजेतेपद पटकावले होते. त्याने देखील आपल्या कारकिर्दीत १९ ग्रँडस्लॅम जिंकले असून या विजेतेपदासह २० ग्रँडस्लॅम नावे असणार्या नदाल आणि फेडररची बरोबरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. गतविजेता म्हणून यंदा स्पर्धेत उतरणाऱ्या जोकोविचलाच सध्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जाते आहे.
या ग्रँडस्लॅमसाठीची सगळ्यात निराशाजनक बातमी म्हणजे राफेल नदाल आणि डॉमिनिक थीम यांची माघार. या माघारीमुळे स्पर्धेतील रंगत काहीशी कमी झाली आहे. मात्र त्याचवेळी नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये जोकोविचला कडवी झुंज देणारा स्टिफिनोस त्सित्सिपास आणि डॅनियल मेदेवदेव हे युवा खेळाडू अनुभवी खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न करतील.
महिला खेळाडूंमध्ये अव्वल खेळाडू नाओमी ओसाकाने मानसिक स्वास्थ्याचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर गतविजेती सिमोना हालेप देखील दुखापतीमुळे यंदा स्पर्धेत उतरणार नाही. त्यामुळे विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची सेरेना विल्यम्सला सुवर्णसंधी आहे. तिला अव्वल मानांकित अॅश्ले बार्टीकडून कडवे आव्हान मिळू शकते. याशिवाय नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या बार्बरा क्रेचीकोवाकडे पण चमत्कार करण्याची क्षमता आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये सगळ्यांच्या नजरा सानिया मिर्झाकडे असतील. ऑस्ट्रेलियन ओपननंतर पुनरागमन करणारी सानिया महिला दुहेरीत बेथानी मॅटेक सॅंड्ससह खेळतांना दिसेल. एकेरी गटात एकही भारतीय खेळाडू स्थान मिळवू न शकल्याने अंकिता रैना, प्रज्ञेश गुणेश्वरन आणि रामकुमार रामनाथन दुहेरीत आपले नशीब आजमावतील.
विम्बल्डन ही टेनिस जगतातील सगळ्यात जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. १८७७ पासून ही स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित केल्या जाते. जागतिक महायुद्धानंतर मागील वर्षी पहिल्यांदाच अशी वेळ आली जेव्हा विम्बल्डनचे आयोजन रद्द करण्यात आले होते. पण आता यावर्षी सफेद रंगाच्या ड्रेसकोड मध्ये खेळवल्या जाणार्या या प्रतिष्ठित आणि राजेशाही स्पर्धेचे पुनरागमन झाले आहे. मात्र यंदाही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे एकीकडे या वातावरणात खबरदारी घेत स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे असेल. मात्र दुसरीकडे चाहत्यांना सर्वोच्च दर्जाच्या टेनिसची अनुभूती घेण्याची संधी असेल.