टेनिस विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा सोमवारी (२८ जून) सुरु झाली. मागील वर्षी दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच स्पर्धा रद्द करावी लागली होती. सोमवारपासून सुरू झालेल्या स्पर्धेच्या १३४ व्या हंगामातील पहिल्या दिवशी सनसनाटी निकाल लागले. ऑल इंग्लंड क्लब इन लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजकांनी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व विद्यमान संघाचा कर्णधार विराट कोहली यांची विम्बल्डनची आठवण सांगणारा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.
विराट व सचिनने लुटला होता विम्बल्डनचा आनंद
विम्बल्डनने २०२१ स्पर्धेपूर्वी आपल्या काही खास आठवणींना व्हिडिओच्या माध्यमातून उजाळा दिला. या मालिकेत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे विम्बल्डनचा आनंद लुटत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन आपली पत्नी अंजली व विराट आपली त्यावेळची प्रेयसी व सध्या पत्नी असलेल्या अनुष्का शर्मासोबत दिसत आहे.
या दोन्ही दाम्पत्यांनी २०१५ मध्ये विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत रॉजर फेडरर विरुद्ध अँडी मरे हा सामना एकत्रितरीत्या पाहिला होता. सचिन हा फेडररचा चांगला मित्र आहे व तो अनेकदा टेनिस खेळाचा आनंद लुटताना दिसून येतो. दुसरीकडे विराट हा मोठा खेळप्रेमी मानला जातो. तो इंडियन सुपर लीग फुटबॉल लीगमध्ये गोवा एफसी संघाचा मालक आहे. तसेच, तो इतर खेळांना देखील प्रोत्साहन देताना दिसतो.
https://www.facebook.com/watch/?v=324393722430964
पहिल्या दिवशी लागला सनसनाटी निकाल
विम्बल्डन २०२१ च्या पहिल्या दिवशी सनसनाटी निकाल पाहायला मिळाला. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्टेफ त्सित्सीपासला अमेरिकेच्या फ्रान्सेस तिएफोकडून पराभूत व्हावे लागले. ही विम्बल्डन रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील अखेरची विम्बल्डन ठरू शकते.
संबधित बातम्या:
विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत फ्रेंच ओपन उपविजेत्या त्सित्सिपासला पराभवाचा धक्का
टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार