भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या १३ व्या हंगामाचा अंतिम सामना कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात तामिळनाडू संघाने बाजी मारली. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून तमिळनाडू संघाने इतिहास रचला. तामिळनाडू संघासाठी या सामन्यात शाहरुख खान विजयाचा हिरो ठरला, ज्याने संघाला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना षटकार ठोकून आपल्या संघाला तिसरे विजेतेपद मिळवून दिले.
या विजयासह तामिळनाडू संघ सय्यद अली मुश्ताक करंडक स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणारा संघ बनला आहे. तामिळनाडू संघाने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले असून अशी कामगिरी करणारा कर्नाटकानंतरचा पहिला संघ ठरला आहे.
साल २००६-०७ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे आतापर्यंत १३ हंगाम खेळले गेले आहेत, त्यापैकी ३ विजेतेपद तामिळनाडूने जिंकले आहेत. तामिळनाडू संघाने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती, त्यानंतर दुसरे विजेतेपद मिळविण्यासाठी त्यांना ११ वर्षे वाट पाहावी लागली. पहिल्या सत्रात तामिळनाडूने विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र संघाने दुसरे सत्र जिंकले. हैदराबादचा पराभव करत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले..
त्याचवेळी तिसऱ्या सत्रात बंगाल संघाने मध्यप्रदेशचा पराभव करत हे विजेतेपद पटकावले. चौथ्या सत्रात बडोद्याच्या संघाचा सामना अंतिम लढतीत पंजाबशी झाला, ज्यामध्ये बडोद्याच्या संघाने विजय मिळवून पहिले विजेतेपद पटकावले. पंजाब संघाने २०१२-१३ मध्ये पुन्हा एकदा अंतिम सामन्यामध्ये धडक मारली होती, पण यावेळी गुजरात संघाकडून पराभव पत्करावा लागला.
साल २०१३-१४ मध्ये, बडोद्याचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचला जिथे त्याचा सामना उत्तर प्रदेशच्या संघाशी झाला. बडोदा संघाने उत्तर प्रदेश संघाचा पराभव करून दुसरे विजेतेपद पटकावले आणि ही कामगिरी करणारा पहिला संघ ठरला.
साल २०१४-१५ मध्ये, गुजरात आणि पंजाब अंतिम फेरीत आमने-सामने आले जेथे गुजरात संघ विजेता म्हणून उदयास आला आणि पंजाबला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. २०१५-१६ मध्ये उत्तर प्रदेश आणि बडोदा संघ अंतिम फेरीत भिडले, परंतु यावेळी उत्तर प्रदेशच्या संघाने इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही आणि विजेतेपद पटकावले.
साल २०१६-१७ चा अंतिम सामना पूर्व आणि मध्य विभाग यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये पूर्व विभागाचा विजय झाला, तर २०१७-१८ मध्ये दिल्ली संघाने राजस्थानचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. यानंतर कर्नाटकच्या संघाने सलग दोन हंगाम जिंकले, तर तामिळनाडूचा संघ गेल्या दोन हंगामात चॅम्पियन ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत देशातील ३८ संघ सहभागी होतात.
महत्त्वाच्या बातम्या –
सरावाच्या वेळी कोहलीला ‘क्यूट’ पाहुण्याने भेट देताच अनुष्का शर्माची आली ‘अशी’ प्रतिक्रिया
हॉटेलमध्ये घंटानाद आणि घुंगरांसह रामभजन, भारत-न्यूझीलंड क्रिकेटपटूंचे कानपूरमध्ये अनोखे स्वागत