काल दिनांक ६ ऑक्टोबर पासून भारतात फिफा अंडर १७ विश्वचषकाचा थरार सुरु झाला. मैदानाबाहेर मोठमोठी होर्डिंग्ज लावून विश्वचषकासाठी लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली गेली होती. मैदानाबाहेर आणि मैदानावरील गर्दी पाहून होर्डिंगबाजी आणि जाहिरातींना फळ मिळाले असे वाटत होते.
मैदानाच्या आवारात उत्तम सुरक्षेची जबाबदारी घेत ठिकठिकाणी पोलिसांचा योग्य बंदोबस्त करण्यात आला होता. सर्व गोष्टी शिस्तबद्ध दिसत होत्या ज्यांनी ऑनलाईन तिकिटे बुक केली आहेत त्यांना ती मिळवून देण्याची सोय तिकीट काउंटरच्या बाजूला करण्यात आली होती. तुम्ही ज्या विभागाचे तिकीट काढले आहे तेथील गेटमधूनच प्रवेश होता आणि तोही अद्यावत सुरक्षा पडताळणी करूनच.
या मैदानाच्या आवारात एक मुख्य गोष्ट दिसली ती म्हणजे या विश्वचषकासाठी जे स्वयंसेवक होते ते प्रत्येक गेट आणि सर्वत्र मोठ्या संख्येने होते. बाहेरील सुरक्षा कर्मचारी यांनी पोलीस यांच्यापेक्षा जास्त संख्येने स्वयंसेवक येथे उपलब्ध होते. आतील सर्व सुरक्षेची जबादारी फुटबॉल वर अतोनात प्रेम करणाऱ्या या तरुणांवर होती. स्वयंसेवकांमध्ये मुलांइतकीच मुलींची संख्या असणे ही खूप लक्षणीय बाब होती.
मैदानाच्या आवारात ऐकू येणाऱ्या जल्लोषाने आतमध्ये हजारोंच्या संख्येने प्रेक्षक नक्की असतील असे भासत होते आणि मुख्य मैदानात गेल्यावर तो अंदाज खरा ठरला. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक सामन्यांसाठी उपस्थित होते. तेही तटस्थ देशाचे फुबॉलचे सामने पाहायला हा योग आणि जादू फक्त फिफा स्पर्धेमुळेच शक्य होणारी होती.
या सामन्यांसाठी हे प्रेक्षक फक्त हजेरी लावण्यास आले नव्हते तर ते एक सपोर्टींग स्पिरिट घेऊन या मैदानावर आले होते. पहिला सामना होता न्युझीलँड आणि तुर्की या देशांमध्ये. हा सामना सुरु होण्यापूर्वी जेव्हा दोन्ही देशांची राष्ट्रगीते वाजवण्यात अली तेव्हा प्रत्येक प्रेक्षक हा अभिमानाने उभा होता जसे की भारताचे राष्ट्रगीत चालू आहे. भारतीय लोक किती उदारमतवादी आणि प्रेम करणारी आहेत ते या प्रसंगाने दिसून आले.
पहिला सामना १-१ असा बरोबरीत सुटला. दुसरा सामना पॅराग्वे आणि माली या देशात झाला. या सामन्याने खरे तर प्रेक्षकांची मने जिंकली. खेळाडूंच्या प्रत्येक कौशल्याचे प्रेक्षक वाहवाही करता होते, त्या खेळाडूंसोबत उत्साही होत होते तर संधी गमावल्याबरोबर नाराजही होत होते. एकूणच या सामन्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
माली या देशाचे या स्पर्धेपूर्वी नावही न जाणणारे प्रेक्षक त्यांच्या खेळणे प्रेरित होऊन त्यांना पाठिंबा देत होते. पहिल्या २० मिनिटात माली देशाच्या संघाने २ गोल स्वीकारले तेव्हा पॅराग्वे हा सामना आरामात खिशात घालेल असे वाटले परंतु मालीने त्यानंतर उत्तम चाली रचल्या काही वयक्तीक कौशल्य दाखवली आणि पहिल्या सत्रातच २-२ अशी बरोबरी केली.
पॅराग्वे यांनी उत्तम तांत्रिक खेळ केला आणि लॉन्ग पासेस वर भर दिला. मिडफिल्डमध्ये मालीचा दबदबा होता तर डिफेन्समध्ये जिकराची कामगिरी करत पॅराग्वे त्यांना संधी देत नव्हते. पॅराग्वेला पेनल्टी मिळाल्याने त्यांनी ३-२ अशी आघाडी मिळवली परंतु मालीने बरोबरीसाठी खूप प्रयन्त केले. हा सामना पॅराग्वेने ३-२ असा जिंकला परंतु वेग, कौशल्य आणि नवीन चाली यांचा सुरेख खेळ करत मालीने हा सामना उत्कंटावर्धक केला होता. त्यामुळे त्यांनी अनेक भारतीयांची मने जिंकली. विश्वचषकाअगोदर ज्या देशाचे अनेकांना नाव देखील माहिती नव्हते त्या देशाचे अनेक खेळाडूंची नावे ते आयुष्यभर विसरणार नव्हते.
सामना संपला आणि त्यानंतर बाहेर पडताना अनेक प्रेक्षक बोलत होते की मालीने सामना जिंकायला हवा होता. सामना म्हटले की कोणी एक विजेता ठरणार कोणी पराजित होणार हे ठरलेले आहे प्रत्येकवेळी खेळ जिंकला पाहिजे आणि या सामन्यानंतर मला वाटते भारतीयांमध्ये आपले विशिष्ठ स्थान निर्माण करत फुटबॉल हा खेळ जिंकला होता.