काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंड संघाला भारताविरुद्ध न खेळताच बाहेर पडावे लागले होते. हा भारत विरुद्ध इंग्लंड संघातील उपांत्य सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आणि राखीव दिवस नसल्याने रद्द करण्यात आला होता.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार अ गटात अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर इंग्लंडचे आव्हान न खेळताच संपुष्टात आले होते. मात्र, यामुळे आयसीसीच्या नियमांवर टीकांचा भडिमार करण्यात आला.
त्यामुळे आता आयसीसीने 2021ला होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाच्या 2 उपांत्य सामन्यांसाठी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. याबद्दल आयसीसीने आज पुढीलवर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करताना पुष्टी केली आहे.
हा वनडे विश्वचषक पुढीलवर्षी न्यूझीलंड येथे 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान होणार असून त्यात 31 सामने होणार आहेत. तसेच, हे सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, हॅमिल्टन, तौरंगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डूनडीन या 6 ठिकाणी होणार आहेत.
या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यात गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. तर अन्य 4 संघांचा समावेश महिला चॅम्पियनशीप आणि जूलैमध्ये श्रीलंकेत पार पडणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीनंतर होईल.
विश्वचषकातील 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान साखळी फेरी पार पडेल. त्यानंतर तौरंगा आणि हॅमिल्टनला अनुक्रमे 3 आणि 4 मार्चला उपांत्य सामने होतील. 7 मार्चला ख्राईस्टचर्च येथे अंतिम सामना पार पडेल.
या विश्वचषकात सहभागी होणारे 8 संघ राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरी सुरु असताना एकमेकांशी सामना खेळेल. हे सामने झाल्यानंतर अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
या वनडे विश्वचषकासाठी 5.5 मिलियन डॉलर्स इतकी बक्षीस रक्कम आहे.






