सोमवारी (9 नोव्हेंबर) सायंकाळी शारजाह येथे महिला टी-20 चॅलेंजचा अर्थात महिला आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सुपरनोवाज विरुद्ध ट्रेलब्लेजर्स या दोन संघांत हा सामना होणार असून सुपरनोवाज आपली विजेतेपदाची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी तर ट्रेलब्लेजर्स आपला पहिला किताब जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहेत.
आयपीएल ‘प्ले ऑफ’ दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून महिला टी-20 चॅलेंज या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेत तीन महिला संघ भाग घेतात. ज्यांच्यात तीन लीग स्टेजचे सामने होतात. गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असलेले संघ अंतिम सामना खेळतात. असे एकूण चारच सामने या स्पर्धेत असतात. 2018 व 2019 या दोन्ही वर्षी सुपरनोवाज संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा ते अंतिम सामन्यात खेळणार आहेत.
यंदाच्या हंगामात सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर आणि वेलोसिटी या तिन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. पण सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर संघ नेटरनरेटच्या जोरावर अंतिम सामन्यात पोहचले आहेत.
दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू
सुपरनोवाज संघात सलामीला येणारी चमारी अटापट्टू हिने या हंगामात 111 धावा केल्या असून संघाला मजबूत सुरुवात दिली आहे. तिने ट्रेलब्लेजर्स विरोधात मागील सामन्यात अर्धशतक देखील ठोकले आहे. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दोन्ही सामन्यांत 31-31 अशा एकूण 62 धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये सुपरनोवाजकडे पूनम यादव, खाका आयाबोंगा आणि सेलमन हे पर्याय आहेत.
ट्रेलब्लेजर्स संघ या हंगामात चांगला खेळ करताना दिसत आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात वेलोसिटीला मात्र 47 धावांवर सर्वबाद केले होते तर सुपरनोवाजविरुद्धचा दुसरा सामना मात्र 2 धावांनी गमावला होता. ट्रेलब्लेजर्सकडे गोलंदाजीची एक वेगळीच ताकद आहे. त्यांच्याकडे टी-20 मधील क्रमांक 1 ची गोलंदाज सोफी एकलेस्टोन, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड व अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आहे.
फलंदाजी विभागात सलामी फलंदाज डिएंड्रा डॉटिन व मधल्या फळीत दीप्ती शर्मा उत्तम खेळ करीत आहे. कर्णधार स्मृती मंधनाने या हंगामात मात्र 39 धावा केल्या असून अंतिम सामन्यात तिच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा सर्वांना असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
…तर रोहित जाणार नाही ऑस्ट्रेलियाला; विराटही ३ कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता
असा झाला दिल्ली कॅपिटल्सचा १३ वर्षांचा आयपीएलमधील प्रवास
पृथ्वी शॉने ‘ही’ गोष्ट केली तर सामना दिल्लीच्याच हातात येईल, दिग्गजाचा सल्ला