भारतीय महिला वनडे विश्वचषक २०२२ आता एक दिवसावर येऊन ठेपला आहे. विश्वचषकाचा १२ वा हंगाम शुक्रवारपासून (०४ मार्च) सुरू होत आहे. ही स्पर्धा न्यूझीलंड येथे होणार आहे. स्पर्धा जरी ४ मार्चपासून सुरू होत असली, तरीही मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वातील भारतीय संघाचा पहिला सामना हा ६ मार्च रोजी होणार आहे. यावेळी भारतीय संघ पाकिस्तान संघाशी भिडणार आहे. स्पर्धेच्या किताबाची आकडेवारी पाहिली, तर आतापर्यंत फक्त ३ संघांनाच या किताबावर आपले नाव कोरता आले आहे. त्यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा आणि इंग्लंडने ४ वेळा हा किंताब जिंकला आहे, तर न्यूझीलंडने फक्त एक वेळा हा किताब आपल्या नावावर केला आहे.
भारताचा विश्वचषकातील आकडेवारी पाहिली, तर ती पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला आहे. भारतीय संघ २००५ आणि २०१७ मध्ये दोनदा उपविजेता ठरला होता. म्हणजेच अंतिम फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, जर पाकिस्तानच्या महिला संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना आतापर्यंत उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाही. सुपर-६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. २००९ मध्ये संघाला असे करण्यात यश आले होते. अशा परिस्थितीत यावेळीही स्पर्धेत भारताचेच पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
प्रत्येक वेळी भारतानेच मिळवला विजय
वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर त्यात भारतीय संघच पुढे आहे. आतापर्यंत दोघांमध्ये ३ सामने खेळण्यात आले आहेत आणि हे सर्व सामने भारतानेच जिंकले आहेत. सर्वप्रथम भारत आणि पाकिस्तान २००९ साली एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी भारताने १० विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला होता. त्यानंतर २०१३ मध्ये झालेल्या सामन्यात भारताना पाकिस्तानवर ६५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर हे दोन्ही संघ २०१७ साली विश्वचषकात शेवटचे भिडले होते. त्यावेळी भारताने ९५ धावांनी सामना खिशात घातला होता.
संघांच्या एकूण वनडे सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघात आतापर्यंत १० सामने खेळले गेले आहेत आणि भारतीय संघ सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. संघाला आतापर्यंतच्या सर्वात कमी फरकाने म्हणजेच ८० धावांनी विजय मिळाला आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान संघ वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाला कधीच टक्कर देऊ शकलेला नाहीये.
या स्पर्धेत ८ संघ आपला दम दाखवणार आहेत. तसेच, या स्पर्धेत ३१ सामने खेळले जाणार आहेत, तर स्पर्धेचा अंतिम सामना ३ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे.