टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या महिला व पुरुष हॉकी संघानी अविस्मरणीय कामगिरी करत उपांत्य फेरीमध्ये जागा मिळवली आहे. पुरूष संघाने १९८० नंतर तर, महिला संघाने ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच अशी कामगिरी केली. देशभरातून सर्व हॉकीपटूंचे अभिनंदन केले जात असताना, २०२३ हॉकी विश्वचषकासाठीची तयारी देखील जोरदारपणे सुरू असून, त्याचाच भाग म्हणून जगातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमचे काम करण्यात येत आहे.
या शहरात होणार जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम
आगामी हॉकी विश्वचषकाचे आयोजन २०२३ मध्ये ओडिसा येथे केले जाणार आहे. ओडिसामधील भुवनेश्वर व राऊरकेला या शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकासाठी राऊरकेला येथे जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम उभारण्यात येत आहे. २०,००० प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियमला बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असे नाव देण्यात येईल.
या स्टेडियमच्या कामाची कोनशिला या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते उभारण्यात आली. या मैदानासोबतच भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर देखील विश्वचषकातील काही सामने खेळवले जाणार आहेत.
Odisha is building the world's largest Hockey stadium in Rourkela for the Hockey World Cup 2023. pic.twitter.com/GYuOpjLejM
— Somesh Upadhyay, IAS (@Somesh_IAS) August 2, 2021
ओडिसा सरकारचे हॉकीसाठी मोठे योगदान
ओडिसा राज्य सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देशामध्ये हॉकीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ओडिसा सरकार भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रायोजक आहे. तसेच, भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय सुविधा ओडिसा सरकारनेच पुरविल्या होत्या. याकामी भारताचा माजी हॉकीपटू दिलीप तिर्की सरकारला मार्गदर्शन करत असतो.
चौथ्यांदा होणार भारतात आयोजन
हॉकी विश्वचषकाचे आत्तापर्यंत भारतामध्ये तीन वेळा आयोजन झाले आहे. १९८२ मध्ये मुंबई येथे, २०१० मध्ये नवी दिल्ली व २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषक खेळला गेला होता. भारताने आजवर केवळ एकदाच १९७५ साली विश्वचषक आपल्या नावे केला आहे. क्वालालंपूर येथे झालेल्या या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
चक दे इंडिया! पुरुष आणि महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या कमलजीत कौरनं थाळीफेकीत फायनल गाठली, पण पदक हुकलं