---Advertisement---

भारताचा ‘हा’ क्रिकेटर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर; सरावादरम्यान झाली दुखापत

On: सोमवार, ऑगस्ट 2, 2021 6:55 PM
---Advertisement---

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला ४ ऑगस्टपासून यजमान इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल दुखापतग्रस्त झाला असल्याने नॉटिंगघम येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (२ ऑगस्ट) नॉटिंगघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना मयंकच्या हेल्मेटवर चेंडू लागला. त्यामुळे त्याला कन्कशनचा त्रास होत असल्याने पहिल्या कसोटीतून बाहेर पडावे लागले आहे.

बीसीसीआयने सांगितले आहे की वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार केले आहेत आणि त्याची कन्कशन टेस्टही घेतली. त्याच्यामध्ये कन्कशनची काही लक्षणे दिसली असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर बीसीसीआयने सांगितले आहे की सध्या मयंक स्थिर असून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल.

भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण 
या मालिकेपूर्वी भारताला दुखापतींनी ग्रासले आहे. काहीदिवसांपूर्वी डरहॅम येथे झालेल्या काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू या कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत.

त्यांच्याऐवजी राखीव खेळाडू म्हणून या दौऱ्यावर गेलेल्या अभिमन्यू ईश्वरनला मुख्य संघात सामील करण्यात आले. तसेच सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांनाही बदली खेळाडू म्हणून इंग्लंड दौऱ्यावर बोलवण्यात आले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, मयंक अगरवाल(पहिल्या कसोटीतून बाहेर), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.
राखीव खेळाडू – प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंगघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर

महत्त्वाच्या बातम्या – 

चक दे इंडिया! पुरुष आणि महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या कमलजीत कौरनं थाळीफेकीत फायनल गाठली, पण पदक हुकलं

बिग ब्रेकिंग! भारताचा ‘हा’ क्रिकेटर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर; सरावादरम्यान झाली दुखापत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---