वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत एक नाव चांगलेच चर्चेत आहे. ते म्हणजे न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्र. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 9 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार रचिन रवींद्र ठरला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीतून जबरदस्त योगदान देत सामनावीर पुरस्कारही पटकावला.
रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याच्या नावामागे एक रहस्य आहे. ते असे की, त्याचे नाव भारताचे दिग्गज खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावावरून ठेवले आहे. अशात भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला रचिनच्या फलंदाजीविषयी प्रश्न विचारला गेला. यावर द्रविडने मजेशीर अंदाजात म्हटले की, रचिनच्या फलंदाजीत ‘र’ (राहुल) पेक्षा जास्त प्रभाव ‘चिन’ (सचिन) याचा आहे.
बंगळुरू येथे जन्मलेल्या रचिनच्या वडिलांनी त्याचे नाव राहुलच्या नावावरून ‘र’ आणि सचिनच्या नावावरून ‘चिन’ घेत रचिन रवींद्र असे ठेवले आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 06) द्रविडला विचारले, तेव्हा तो म्हणाला, “मी काल त्याला फलंदाजी करताना पाहिलं. त्याने 5 षटकार मारले. कदाचित हे ‘रे’ पेक्षा जास्त ‘चिन’ होते, जे आपण मैदानावर पाहिले. मी चेंडू स्क्वेअरच्या बाहेर मारू शकत नाही. असू शकते की, यामध्ये सचिनने त्याची निश्चितरीत्या मदत केली असेल.”
पुढे बोलताना द्रविड असेही म्हणाला की, “इंग्लंडविरुद्ध रचिनने कमालीची फलंदाजी केली. मी त्याला कानपूर येथे आमच्याविरुद्ध खेळतानाही पाहिले होते. मला त्याचे नाव लक्षात आहे. कारण, त्याने कसोटी सामना वाचवला होता.”
रचिनचा पराक्रम
गुरुवारी (दि. 05 ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध आधी गोलंदाजी करताना रचिनने 10 षटके टाकत 76 धावा खर्चून 1 विकेट घेतली होती. तसेच, नंतर फलंदाजी करताना त्याने गोलंदाजीत खर्च केलेल्या धावा बॅटमधून वसूल केल्या. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध टिच्चून फलंदाजी करताना 96 चेंडूत नाबाद 123 धावांची शतकी खेळी साकारली. यामध्ये 5 षटकार आणि 11 चौकारांचाही समावेश होता. अशाप्रकारे तो कमी वयात विश्वचषकात शतक करणारा न्यूझीलंडचा खेळाडूही ठरला. (world cup 2023 head coach rahul dravid statement on rachin ravindra name)
हेही वाचा-
Asian Games Final: ऋतुराजसेनेने जिंकला टॉस, सुवर्णपदकासाठी IND vs AFG संघात महामुकाबला
Asian Gamesमध्ये पाकिस्तानची लईच वाईट अवस्था, कांस्य पदकाच्या सामन्यात बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर लोळवलं