विश्वचषक 2023 स्पर्धेतील सोमवारचा (दि. 23 ऑक्टोबर) दिवस अफगाणिस्तान संघासाठी अविस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या 22व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते. चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. हा वनडेतील अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्ध पहिला वहिला विजय ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम खूपच भडकला. त्याने सामन्यानंतर संघातील चुका सांगत, काही खेळाडूंनाही पराभवासाठी जबाबदार ठरवले.
या सामन्यात बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 282 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 49 षटकात फक्त 2 विकेट्स गमावत 286 धावा केल्या. तसेच, सामना 8 विकेट्सने खिशात घातला.
कुणावर फोडले पराभवाचे खापर?
अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर बाबर आझमने सांगितले की, त्यांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली नाही आणि विकेट्स घेण्यातही यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे सामना गमावला. यावेळी तो असेही म्हणाला की, “यामुळे आम्हाला खूपच त्रास होतो. कारण, आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती.”
बाबर म्हणाला, “आमचे गोलंदाज मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यात फ्लॉप ठरले. जर तुम्ही एकाही विभागात चांगली कामगिरी करत नाही, तर सामना तुमच्या हातून निसटतो. अफगाणिस्तान संघाचे फलंदाज आमच्या गोलंदाजांविरुद्ध सहजरीत्या धावा करत होते. मैदानावर ते चौकार-षटकार मारत होते, ज्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले. अफगाणिस्तान संघाने सामन्यादरम्यान शानदार खेळ दाखवला.”
बाबर असेही म्हणाला की, “अफगाणिस्तान संघ आमच्या संघातील तिन्ही विभागापेक्षा सर्वात शक्तिशाली दिसला. त्यामुळेच सामना त्यांच्या नावावर झाला. मागील तीन सामन्यांपासून आमचा संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अपयशी ठरत आहे. मात्र, पुढील सामन्यात याची काळजी घेऊ.”
बाबरची कामगिरी
या सामन्यात पाकिस्तान संघाकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा बाबर आझम यानेच केला. त्याने या सामन्यात 92 चेंडूंचा सामना करताना 74 धावा केल्या. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त अब्दुल्ला शफीक यानेही 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानला 27 ऑक्टोबर रोजीच्या पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा सामना करायचा आहे. (world cup 2023 pak captain babar azam statement after pakistan lost match against afghanistan by 8 wickets)
हेही वाचा-
अफगाणिस्तानने केले विजयाचे सीमोल्लंघन! पाकिस्तानच्या पदरी वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव
VIDEO । बाबरच्या शुजची लेस बांधण्यासाठी आला नबी, पाकिस्तानी कर्णधाराच्या एका गोष्टीने जिंकले सर्वांचे मन