वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक फॉर्ममध्ये असणाऱ्या संघांमध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. कारण, भारताने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी एकही सामना गमावला नाहीये. विशेष म्हणजे, सातव्या विजयासह भारताने उपांत्य फेरीचे तिकीटही मिळवले आहे. भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत करत वनडे विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयासह विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये भारत 14 गुणांसह थेट अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. गोलंदाजीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चमकला. त्याने 5 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराजने 3 विकेट्स नावावर केल्या. अशात भारताच्या या विजयानंतर चोहो बाजूंनी भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. यामध्ये पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आमिर सोहेल (Aamer Sohail) याच्या नावाचाही समावेश आहे. आमिर सोहेल रोहित शर्मा (Aamer Sohail Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघावर खुश झाला असून त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काय म्हणाला आमिर सोहेल?
खरं तर, युट्यूबवरील एका क्रिकेट चॅनेलशी बोलताना आमिर सोहेल याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या 33व्या सामन्यात भारताने मिळवलेल्या शानदार विजयानंतर स्तुतीसुमने उधळली. तो म्हणाला, “खरं सांगायचं झालं, तर इतका तगडा भारतीय संघ आजपर्यंत पाहिला नाही. यांचे वेगवान गोलंदाज, फिरकीपटू, फलंदाज, सलामीवीर, यष्टीरक्षक प्रत्येक बाबतीत कमाल आहेत. हे आतापर्यंत विश्वचषकात सर्व संघांना पराभूत करत पुढे आले आहेत. त्यांनी आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला आणि श्रीलंका संघाला 50 धावांवर बाद केले. तुम्ही म्हणू शकता की, तो श्रीलंका संघाचा खराब दिवस होता, पण त्यांनी या सामन्यात असे पुन्हा करून दाखवले.”
यासोबतच त्यांनी म्हटले की, “ज्याप्रकारे यांची वेगवान गोलंदाजी सुरू आहे, ते असामान्य आहे. ज्याप्रकारे बुमराह मधल्या स्टम्पवरून चेंडू बाहेर काढत आहे आणि क्रीझच्या कोपऱ्यात जाऊन पूर्ण नियंत्रणाने निघत आहे, हे अविश्वसनीय आहे. त्यानंतर सिराज आणि शमीलाही पाहा. आधीपेक्षा जास्त खतरनाक झाले आहेत आणि फलंदाजांना मैदानावर जास्त वेळ क्रीझवर टिकू देत नाहीत.”
भारताचा पुढील सामना
अशात भारतीय संघाचे स्पर्धेतील फक्त 2 सामने उरले आहेत. भारताचा पुढील आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये 5 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर भारताला 12 नोव्हेंबर रोजी आपला आणि स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडणार आहे. अशात या दोन्ही सामन्यांसाठी क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. (world cup 2023 pakistan ex captain aamer sohail impressed with rohit sharma lead team india said this read here)
हेही वाचा-
वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला जबर धक्का! मॅचविनर आख्ख्या स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला ताफ्यात मिळाली जागा
श्रीलंकेच्या लाजीरवाण्या पराभवानंतर तुटला माजी खेळाडूच्या अश्रूचा बांध! व्हिडिओ शेअर करत मांडल्या भावना