वनडे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघाने बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) नेदरलँड्स संघाचा 309 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाचा हा एकूण वनडे क्रिकेटमधील धावांच्या हिशोबाने दुसरा मोठा विजय ठरला. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय होता. पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतर संघावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, पण आता या संघाने तीन विजयासह पाकिस्तानसाठी संकट उभे केले आहे. तसेच, पॉईंट्स टेबलमध्येही खळबळ माजली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने पाकिस्तानचे नुकसान
उपांत्य फेरीच्या बाजूने पाहिले, तर पाकिस्तान संघाला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी उरलेल्या चार सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच, त्यांना इतर संघांवरही अवलंबून राहावे लागेल. त्यात भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ मजबूत स्थितीत आहेत. इंग्लंडची स्थिती वाईट आहे. मात्र, त्यांच्याकडेही अजून सर्व सामने जिंकून अंतिम चारमध्ये जाण्याची संधी आहे. मात्र, त्यांचीही स्थिती पाकिस्तानसारखीच आहे. म्हणजेच, शेवटी पाकिस्तानची टक्कर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होऊ शकते. ऑस्ट्रेलिया संघ 3 विजय मिळवत 6 गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
पॉईंट्स टेबलची स्थिती
पाकिस्तान संघाचे सध्या 4 गुण आहेत. पाकिस्तान संघ जर सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरला, तर ऑस्ट्रेलिया संघाच्या पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल. तसेच, ऑस्ट्रेलियाने उरलेले 4 सामने जिंकले, तर पाकिस्तान संघ बाहेर होऊ शकतो. कदाचित बाबर आझम याच्या नेतृत्वातील संघ ऑस्ट्रेलियाच्या पराभवासाठी प्रार्थना करत असावा. सध्याच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ 10 गुणांसह अव्वलस्थानी, दक्षिण आफ्रिका 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी, तर न्यूझीलंडही 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने चौथा क्रमांक पटकावला आहे. मात्र, त्यांचे 6 गुण आहेत. पाकिस्तान संघाची 4 गुणांसह पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
Every World Cup match is reshaping the points table, with India, SA, and New Zealand securing their spots in the semis. Now, the spotlight is on the race for the 4th spot, demanding keen attention to net run rate. Will be shocking if one of India-NZ-SA doesn’t qualify for SF.… pic.twitter.com/Bj2tMAqgah
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 25, 2023
‘या’ संघांसाठी उपांत्य फेरी कठीण
अफगाणिस्तान संघाचे 5 सामन्यात 4 गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेट मुळे पाकिस्तान त्यांच्या आधीच्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान संघ सहाव्या स्थानी आहे. तसेच, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड्स संघाचे प्रत्येकी 2 गुण आहेत. मात्र, नेदरलँड्स संघ या पराभवानंतर अखेरच्या म्हणजेच 10व्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंका 7व्या, इंग्लंड 8व्या आणि बांगलादेश 9व्या स्थानी आहे. इथून पाकिस्तानला एकही पराभव उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून बाहेर करू शकतो. तसेच, बांगलादेश आणि नेदरलँड्ससाठीही उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपल्या आहेत. (world cup 2023 points table changes after australia beats netherlands read here)
हेही वाचा-
‘मला फलंदाजी करायचीच नव्हती…’, झंझावाती शतक झळकावल्यानंतर मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा
वर्ल्डकप इतिहासातील वेगवान शतक ठोकल्यानंतर मॅक्सवेलचे चकित करणारे विधान; म्हणाला, ‘मी तर असं…’