वनडे विश्वचषक इतिहासात धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलिया संघाने केला. त्यांनी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 24व्या सामन्यात नेदरलँड्स संघाचा तब्बल 309 धावांनी धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील पहिले दोन सामने गमावल्यानंतर विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. या विजयात ग्लेन मॅक्सवेल याचा सिंहाचा वाटा होता. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर मॅक्सवेलने मोठे विधान केले.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्यांनी निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 399 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स (Netherlands) संघाचा डाव अवघ्या 21 षटकात 90 धावांवर संपुष्टात आला.
काय म्हणाला मॅक्सवेल?
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला, “मी सर्वात वेगवान शतक करण्याची कोणतेही लक्ष्य ठेवले नव्हते. मी फक्त सामन्याच्या स्थितीनुसार फलंदाजी केली. मी माझ्या संघासाठी चांगले योगदान देऊन चांगली धावसंख्या उभारू इच्छित होतो. चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात होते. लयीत येऊन मला चांगले वाटले. मी काही चांगले निर्णय घेतले आणि ते फायदेशीर ठरले.”
पुढे बोलताना मॅक्सवेल असेही म्हणाला की, “मी स्वत:ला थोडा वेळ दिला, ज्यामुळे विश्वास मिळाला. चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, तेव्हा शॉट खेळण्यात यशस्वी झालो. यामुळे माझा विश्वास वाढेल. जेव्हा तुम्ही सातत्याने धावा करू शकत नाही, तेव्हा मनात शंका येऊ लागतात. अशाप्रकारे धावसंख्या बनवून मी खुश आहे.”
ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रदर्शनाविषयी तो म्हणाला की, “हा आमच्यासाठी शानदार विजय राहिला. 400 धावांच्या आसपास धावसंख्या बनवल्या आणि नेदरलँड्सला 100 धावांच्या आत सर्वबाद केले. यामुळे अनेक खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असेल. आम्ही सलग तीन शानदार विजय मिळवले.”
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला. तसेच, ग्लेन मॅक्सवेल याने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने 44 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडत 106 धावा केल्या. त्याने 40 चेंडूत शतक झळकावत विश्वविक्रम केला. मॅक्सवेलला या शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (aus vs ned cwc 2023 all rounder glenn maxwell on his fastest world cup century said this)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे मोठे विधान; म्हणाला, ‘आम्ही आमची क्षमता…’
Big News: भारतीय महिला संघाला मिळाला मुख्य प्रशिक्षक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाडलाय 33 शतकांचा पाऊस