भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सने पराभूत केले. तसेच, पहिला- वहिला आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक जिंकत इतिहास रचला. भारताच्या सीनियर किंवा ज्युनिअर महिला संघाने मिळवलेला हा पहिलाच आयसीसी विश्वचषक होता. या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने ‘काला चष्मा’ गाण्यावर धमाल डान्स केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
आयसीसीने शेअर केला व्हिडिओ
आयसीसीने इंस्टाग्राम अकाऊंटवर भारतीय महिला (India Women) संघाच्या डान्स मूव्हजचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “विजय मैदानावरही आणि मैदानाच्या बाहेरही.”
https://www.instagram.com/reel/CoAQnuDopRI/
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत भारतीय महिला संघ जर्सी आणि मेडलसोबत ‘काला चष्मा’ (Kala Chashma) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खेळाडूंनी गाण्यातील हुक स्टेपही शानदार पद्धतीने केली आहे. या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 80 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 11 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 5 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.
या व्हिडिओवर एका चाहतीने कमेंट करत ‘दंगल’ सिनेमातील डायलॉग लिहिला आहे की, “म्हारी छोरियां छोरों से कम हैं के” दुसऱ्या एकाने लिहिले की, “चॅम्पियन्स.” आणखी एकाने कमेंट केली की, “मुलींनो तुमचा अभिमान आहे, जय हिंद.”
राहुल द्रविड यांच्याकडून अभिनंदन
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाचे अभिनंदन केले. द्रविड यांनी बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले की, “आजचा दिवस भारतीय महिला अंडर-19 संघासाठी ऐतिहासिक दिवस होता. माझी अशी इच्छा आहे की, 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने महिलांना संदेश द्यावा.”
यानंतर त्यांनी 2018च्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या कर्णधार पृथ्वी शॉ याच्याकडे माईक सोपवला. यावेळी पृथ्वी म्हणाला की, “मला वाटते की, ही एक मोठी कामगिरी आहे. अभिनंदन, शाब्बास.” यानंतर संपूर्ण संघाने महिला संघासाठी एकसोबत टाळ्यांचा गजर केला.
भारतीय महिला संघाची पहिली ट्रॉफी
भारतीय महिला संघ कोणत्याही स्तरावर पहिल्यांदा विश्वविजेता बनला आहे. ज्युनिअर स्तरावर आयसीसीने पहिल्यांदाच महिला विश्वचषकाचे आयोजन केले. भारताने यापूर्वी 2005 आणि 2017ला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता, परंतु ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाकडून पराभूत व्हावे लागले. तसेच, 2020मधील टी20 विश्वचषकातही भारताला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला. पुढे 2022मधील बर्मिंघम राष्ट्रकूल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभवाचा धक्का दिला होता.
बीसीसीआय देणार 5 कोटी
स्पर्धा जिंकल्यानंतर बीसीसीआयने महिला क्रिकेट संघ आणि सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कर्णधार शफाली वर्मा (Shafali Verma) आणि भारतीय संघाला भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी अहमदाबाद येथे बोलावले आहे. जिथे, 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण संघ भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी20 मालिकेचा अखेरचा सामना पाहणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या हस्ते भारतीय महिलांचा सन्मान होणार आहे. (world cup u19 2023 final celebration video shweta shehrawat soumya tiwari dance video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं
लखनऊमध्ये आव्हान गाठताना भारताच्या नाकी नऊ, पंड्याच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयकडून पीच क्यूरेटरची हाकालपट्टी!