क्रिकेटमध्ये विश्वचषकाचे एक वेगळेच महत्त्व आहे. त्यातही तो विश्वचषक जर ५० षटकांचा असेल तर त्याची चर्चाही चाहत्यांमध्ये तशीच असते. दर ४ वर्षांनी होणाऱ्या या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत संघाला चमकदार ट्राॅफी जिंकून देण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पहात असतो.
साल १९७५ पासून सुरु झालेल्या या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धेत आजपर्यंत अनेक खेळाडूंनी भाग घेतला आहे. परंतु केवळ ८ असे खेळाडू आहेत जे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवुन देऊन वनडे क्रिकेटपासून दूर झाले.
मायकेल क्लार्क
मायकेल क्लार्कने २०१५ विश्वचषकात कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवुन दिला. मेलबर्न येथे मायदेशात झालेल्या सामन्यात त्याच्या संघाने न्यूझीलंडला धूळ चारत हा विजय मिळला. यात त्याने ७४ धावा व १ झेल घेतला होता. या सामन्यानंतर क्लार्कने ५ महिन्यांनी कसोटी सामन्यातून क्रिकेटला अलविदा केला.
इम्रान खान
पाकिस्तानचे माजी महान कर्णधार इम्रान खान यांनी १९९२ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंड संघाविरुद्ध मेलबर्न येथे २२ धावांनी विजय मिळवत विश्वचषक जिंकला. या सामन्यात त्यांनी सर्वाधिक ७२ धावा व १ विकेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत.
रोहन कन्हाई
जगातील एक अवलिया महान क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या रोहन कन्हाई यांनी १९७५ विश्वचषकात लाॅर्ड मैदानावर अंतिम सामना खेळला. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषक फायनलमध्ये कन्हाऊ यांनी ५५ धावा व १ झेल घेतला होता. या सामन्यानंतर कन्हाई कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही.
अन्य ५ खेळाडू
साल २०१५ विश्वचषकातच मिशेल जाॅन्सन व ब्रॅड हॅडिन यांनी मायकेल क्लार्कबरोबर वनडे क्रिकेटला अलविदा केला. या सामन्यात जाॅन्सनने ३ विकेट्स व १ झेल घेतला होता तर हॅडिनला फलंदाजीची संधी मिळाली नाही परंतु त्याने यष्टीमागे दोन झेल घेतले होते.
साल २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅकॅग्राने ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात ब्रिजटाऊन येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले होते. त्याने या सामन्यात १ विकेट घेतली होती.
विश्वविजेता खेळाडू ते नावाजलेला पंच
साल १९९९ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून पॉल रफेल हे खेळले होते. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात १ विकेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत. परंतु पंच म्हणून ४८ कसोटी, ७० वनडे व १६ टी२० सामन्यात त्यांनी काम पाहिले.
एस श्रीशांत
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटचा वनडे सामना खेळला होता. मुंबई येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात गोलंदाजी करताना त्याला एकही विकेट मिळली नव्हती. त्या विश्वचषकातील भारताकडून खेळलेले सर्वच खेळाडू त्यानंतर पुढे एकतरी वनडे सामना खेळले. परंतु श्रीशांतला ती संधी मिळाली नाही. पुढेही ती मिळण्याची शक्यता कमीच आहे. तरीही श्रीशांतने २०२३ विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्यातरी विश्वचषक फायनलमध्ये विजयी सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा केलेल्या किंवा तो सामना शेवटचा असलेल्या जगातील ८ खेळाडूंमध्ये त्याचे नाव आहे.
वाचा- २०११च्या विश्वचषकानंतर कारकिर्द संपुष्टात आलेले ३ भारतीय क्रिकेटर