बुधवारी (२३ मार्च) टेनिस विश्वातून मोठी बातमी समोर आली. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेली ऑस्ट्रेलियाची स्टार टेनिसपटू ऍश्ले बार्टी हिने सर्वच टेनिस चाहत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. २५ वर्षीय बार्टीने टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. याबरोबरच ती २४ मार्च रोजी तिच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
तीन ग्रँडस्लॅम विजेत्या बार्टीने (Ashleigh Barty) व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण आणि भावनिक आहे. मी टेनिसमधून माझी निवृतीती जाहीर करत आहे. मला माहित नव्हते की, मी ही बातमी तुम्हाला कशी सांगू, म्हणून मी माझी चांगली मैत्रीण कॅसी डेलाक्वा हिची मदत घेतली.’ (World NO. 1 Ash Barty Announces Retirement From Tennis)
बार्टीने पुढे लिहिले, ‘या खेळाने मला जे काही दिले आहे, त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहिल. या खेळाने मला नेहमीच अभिमान आणि समाधान मिळाले आहे. आत्तापर्यंत मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार. आपण एकत्र तयार केलेल्या आठवणींबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहिल. आणखी माझ्या पत्रकार परिषदेत मी बोलेल.’
https://www.instagram.com/p/Cbbbr7xBX7N/
बार्टीने तिच्या टेनिस कारकिर्दीत कमी वयात मोठे यश मिळवले आहे. तिने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे प्रत्येकी १ विजेतेपद जिंकले आहे. तसेच तिने दोन महिन्यांपूर्वीच जानेवारीमध्ये आपल्याच मायदेशात पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावले होते. ती ओपन एरामध्ये कारकिर्दीतील पहिले तीन ग्रँडस्लम अंतिम सामने जिंकणारी पहिली महिला टेनिसपटू आहे.
तिने तिच्या कारकिर्दीत एकेरीमध्ये एकूण १५ विजेतीपदे मिळवली आहेत, यात डब्ल्यूटीए फायनल्स २०१९चाही समावेश आहे. तसेच तिने आत्तापर्यंत ३०५ विजय आणि १०२ पराभव पाहिले आहेत. तिने ऑलिम्पिकमध्ये देखील ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तसेच ती १२१ आठवडे अव्वल क्रमांकावर राहिली.
क्रिकेटसाठी यापूर्वी घेतलेला टेनिसमधून ब्रेक
बार्टीने यापूर्वी देखील टेनिसमधून २ वर्षांसाठी ब्रेक घेतला होता. यूएस ओपन २०१४ नंतर बार्टीने आपल्या टेनिस कारकीर्दीपासून ब्रेक घेत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले होते. एका वर्षानंतर तिने ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मध्ये खेळताना ब्रिस्बेन हीटचे प्रतिनिधित्व केले होते. तिने क्रिकेटचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही. बार्टी बिग बॅशमध्ये केवळ १० सामने खेळली. ब्रिस्बेन हिट संघासाठी तिची सर्वोच्च धावसंख्या ३९ धावा होती. पण, नंतर दोन वर्षांनी ती पुन्हा टेनिसकडे वळली.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन २०१९: ऍश्ले बार्टीला विजेतेपद; ऑस्ट्रेलियाची ४६ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात