पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानी असलेल्या पुणेकरांचा चाहता खेळाडू क्रोशियाच्या मारिन चिलीच याने स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायनाचा 6-3,3-6,6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले तर, फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झी, स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत 2014 मधील यूएस ओपन विजेत्या मरीनला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दुसऱ्या फेरीत मरीन व रॉबर्टो यांच्यातील तीन सेटपर्यंत चाललेली ही रंगतदार लढत 2 तास 2 मिनिटे चालली. मरीनने आपल्या आक्रमक खेळीने उपस्थित पुणेकरांची मने जिंकली. पहिल्याच सेटमध्ये मरीनने आपल्या बिनतोड सर्व्हिस, बॅकहँड आणि फोरहँडचा सुरेख संगम साधत चौथ्या गेममध्ये रॉबर्टोची सर्व्हिस ब्रेक केली. या सेटमध्ये वर्चस्व राखत मरीनने रॉबर्टोविरुद्ध 6-3 जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या रॉबर्टोने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत सहाव्या गेममध्ये मरीनची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 अशा फरकाने जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मरीनने आपल्या अनुभव व कौशल्याचा पुरेपूर वापर करत रॉबर्टोला निष्प्रभ केले. या सेटमध्ये मरीनने रॉबर्टोला फारशी संधी न देता दुसऱ्या आणि चौथ्या गेममध्ये रॉबर्टोची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा सहज जिंकून पुढच्या फेरीत धडक मारली.
अन्य लढतीत फ्रांसच्या बेंजामिन बोन्झी याने जागतिक क्रमवारीत 40व्या स्थानी असलेल्या फिनलँडच्या एमिल रुसुव्होरीचा 6-1, 7-6(4) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ याने अर्जेंटिनाच्या चौथ्या मानांकित सेबॅस्टियन बेझचा 3-6, 6-1, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
नेदरलँडच्या दुसऱ्या मानांकित बोटिक व्हॅन डी झांडशुल्प याने क्वालिफायर इटलीच्या फ्लॅविओ कोबोलीचे आव्हान 7-5,6-4 असे संपुष्टात आणले. पहिल्या सेटमध्ये बोटिकने नवव्या, अकराव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील बोटीकने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला. रशियाच्या आठव्या मानांकित अस्लन करातसेव याने नेदरलँडच्या टिम व्हॅन रिज्थोवेनचा टायब्रेकदमध्ये 7-6(7) 7-6(8) असा पराभव करून आगेकूच केली. नेदरलँडच्या टॅलन ग्रीक्सपूर याने इटलीच्या मार्को सेचिनाटोचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जर्मनीच्या मॅक्सिमिलियन मार्टेरर याने सर्बियाच्या लास्लो दजेरीला 7-6(5), 6-2 असे पराभूत केले.
दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा सूरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
(World No. 17 Cilic cruises into quarter-finals at 5th Tata Open Maharashtra)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरानचा वेग पाहून अख्तर टेंशनमध्ये! म्हणाला, ‘माझा विक्रम मोडण्याच्या नादात….’
आयसीसी क्रमवारीत हार्दिकसोबत भारताच्या ‘या’ चार खेळाडूंना फायदा, स्मिथने बाबरला टाकले मागे