साउथँम्पटन। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5 जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. द रोज बॉल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला दोन खास विक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात जर विराटने विजय मिळवला तर विराटच्या नेतृत्वाखालील हा भारताचा 50 वा वनडे विजय ठरेल. तसेच विराट भारतीय कर्णधार म्हणून 50 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे विजय मिळवणारा चौथा कर्णधार ठरेल. याआधी एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुलीने 50 पेक्षा अधिक वनडे सामन्यात कर्णधार म्हणून विजय मिळवले आहेत.
सध्या विराटने आत्तापर्यंत भारताचे नेतृत्व करताना 68 वनडे सामन्यांपैकी 49 सामन्यात विजय मिळवला असून 17 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
आत्तापर्यंत भारताने सर्वाधिक वनडे विजय धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. धोनीने भारताचे 200 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील 110 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
वनडेत 11 हजार धावा करण्याची विराटला संधी –
याबरोबरच विराटला वनडेमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याचीही संधी आहे. त्यासाठी त्याला अजून 157 धावांची गरज आहे. सध्या वनडेमध्ये त्याच्या नावावर 227 सामन्यात 59.57 च्या सरासरीने 10843 धावा आहेत. यात त्याच्या 41 शतकांचा आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच वनडेमध्ये आत्तापर्यंत 11 हजार धावांचा टप्पा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन भारतीय खेळाडूंनीच पार केला आहे. सचिनने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. तर गांगुलीने 311 सामन्यात 11363 धावा केल्या आहेत.
#वनडेमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –
110 विजय – एमएस धोनी (200 सामने)
90 विजय – मोहम्मद अझरुद्दीन (174 सामने)
76 विजय – सौरव गांगुली (146 सामने)
49 विजय – विराट कोहली (68 सामने)
42 विजय – राहुल द्रविड (79 सामने)
#वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)
11363 धावा – सौरव गांगुली (311 सामने)
10889 धावा – राहुल द्रविड (344 सामने)
10843 धावा – विराट कोहली (227 सामने)
10500 धावा – एमएस धोनी (341 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: खेळाडूने नाही तर चक्क फोटोग्राफरने घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारण
–विश्वचषक २०१९: भारताच्या या खेळाडूची झाली डोपिंग टेस्ट