महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने 25 वर्षीय भारतीय स्टार फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिची संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आगामी WPL हंगामात दिल्लीचा संघ जेमिमाच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. WPL 2026 ची सुरुवात 9 जानेवारीपासून होणार आहे.
आतापर्यंत झालेल्या तीनही WPL हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंगने केले होते. तिच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला, मात्र अजूनही संघाला विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. आता मेग लॅनिंग दिल्ली संघाचा भाग राहिलेली नाही. मेगा ऑक्शनमध्ये तिला यूपी वॉरियर्सने खरेदी केले असून, त्यामुळे दिल्लीने नव्या कर्णधाराचा शोध घेतला होता.
या पार्श्वभूमीवर फ्रँचायझीने भारतीय खेळाडूवर विश्वास टाकत जेमिमा रोड्रिग्जला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जेमिमा ही WPL इतिहासात दिल्ली कॅपिटल्सची पहिली खेळाडू होती आणि 2023 पासून ती सातत्याने संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली आहे. WPL मध्ये तिने आतापर्यंत 27 सामने खेळत 139.66 च्या स्ट्राइक रेटने 507 धावा केल्या आहेत, ज्यामुळे ती WPL मध्ये 500 हून अधिक धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये सामील आहे.
अलीकडेच जेमिमाने वनडे वर्ल्ड कप 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. सध्या ती श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असून, पहिल्या टी-20 सामन्यात तिने नाबाद 69 धावांची खेळी केली होती.
मेगा ऑक्शनदरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदल यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, यावेळी संघाला भारतीय कर्णधार हवा आहे. त्या धोरणानुसारच फ्रँचायझीने जेमिमावर विश्वास दाखवला आहे. जरी जेमिमाने यापूर्वी कधीही भारतीय संघ किंवा WPL मध्ये कर्णधारपद भूषवलेले नसले, तरी तिचा अनुभव, फॉर्म आणि नेतृत्वगुण लक्षात घेता हा निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.






