महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा अंतिम सामना आता निश्चित झाला आहे. वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 7 विकेट्सनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. याआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने थेट फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले होते. त्यामुळे आता WPL 2026 च्या जेतेपदासाठी RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार 7 वाजता मैदानात उतरतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची धुरा स्मृती मानधनाकडे असून दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व जेमिमा रोड्रिग्स करणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत फायनलपर्यंत मजल मारली आहे.
RCB संघासाठी हा अंतिम सामना विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 मध्ये WPL चे जेतेपद पटकावलेल्या RCB ने याआधीच्या दोन हंगामात लीग टप्प्यातच गाशा गुंडाळला होता. मात्र, यंदा त्यांनी दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा फायनल गाठला आहे. RCB दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ सातत्याने फायनलमध्ये पोहोचत असला तरी अद्याप त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. प्रत्येक हंगामात अंतिम फेरी गाठूनही ट्रॉफीपासून दूर राहिलेल्या दिल्लीसाठी यंदाचा हंगाम सुवर्णसंधी ठरणार आहे.
एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने एकतर्फी वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. बेथ मूनीच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने 168 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरात शेफाली वर्मा (31) लिजेल ली (43) आणि कर्णधार जेमिमा रोड्रिग्स (41) यांच्या भक्कम फलंदाजीमुळे दिल्लीने अवघ्या 3 विकेट्स गमावत लक्ष्य सहज गाठले.






