---Advertisement---

WPL 2026: प्लेऑफची गणितं गुंतागुंतीची, दोन जागांसाठी चार संघांची झुंज; मुंबई बाहेर पडणार का?

On: रविवार, जानेवारी 25, 2026 3:44 PM
---Advertisement---

वूमन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील चौथ्या मोसमात शनिवारी (24 जानेवारी) खेळल्या गेलेल्या 15 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मोठा विजय मिळवला. जेमिमाह रॉड्रिग्सच्या नेतृत्वाखाली दिल्लीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत आरसीबीचा विजयरथ रोखला. हा आरसीबीचा या मोसमातील पहिलाच पराभव ठरला असून, दिल्लीने या विजयासह प्लेऑफमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

दिल्लीसाठी हा चौथ्या हंगामातील तिसरा विजय ठरला. या निकालामुळे पॉइंट्स टेबलमधील चुरस आणखी वाढली असून दिल्लीला मोठा फायदा झाला आहे. या विजयामुळे दिल्लीने टॉप-2 मध्ये प्रवेश केला असून सध्या संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. प्लेऑफसाठीचा दिल्लीचा दावा या निकालानंतर अधिक मजबूत झाला आहे.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या मोसमात दमदार कामगिरी करत सलग पाच सामने जिंकले होते. त्या जोरावर आरसीबीने प्लेऑफचं तिकीट आधीच पक्कं केलं आहे. दिल्लीविरुद्ध पराभव पत्करूनही आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे.

गुजरात जायंट्सने आतापर्यंत तीन सामने जिंकले असून 6 गुणांसह संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र नेट रनरेट दिल्लीपेक्षा कमी असल्याने गुजरातला एक स्थान खाली समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी दिल्ली आणि गुजरात यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे.

या मोसमात पाच पैकी तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. पॉइंट्स टेबलमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे टॉप-2 मध्ये स्थान मिळवणं सर्व संघांसाठी महत्त्वाचं ठरत आहे.

साखळी फेरीत प्रत्येक संघ आठ सामने खेळणार आहे. आतापर्यंत सर्व संघांनी प्रत्येकी सहा सामने खेळले आहेत. दिल्ली आणि गुजरातने सहापैकी प्रत्येकी तीन सामने जिंकले असून त्यांना 10 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्ज यांनी मात्र सहापैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. उर्वरित सर्व सामने जिंकले तरी या दोन्ही संघांना 8 गुणांपेक्षा अधिक गुण मिळणार नाहीत.

दिल्लीला उर्वरित दोन सामन्यांत गुजरात आणि यूपीचा सामना करायचा आहे. यापैकी एकही सामना गमावल्यास दिल्लीची वाटचाल अडचणीत येऊ शकते आणि प्लेऑफचं चित्र नेट रनरेटवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रत्येक सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---