महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सने या हंगामातील आपला दुसरा सामना जिंकत विजयी वाटचाल कायम ठेवली असली, तरीही गुणतालिकेत अव्वल स्थानावर अद्याप रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB)च विराजमान आहे. पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवलेल्या आरसीबीकडे 4 गुण असून, उत्कृष्ट नेट रन रेटमुळे त्यांनी टॉप स्थान कायम राखले आहे.
मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स आणि आरसीबी या तिन्ही संघांकडे सध्या समान 4 गुण आहेत. मात्र, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा नेट रन रेट +1.964 इतका दमदार आहे. याच कारणामुळे मुंबई इंडियन्स (+0.901) आणि गुजरात जायंट्स (+0.105) या संघांना आरसीबीच्या पुढे जाता आलेले नाही.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 3 सामने खेळून 2 विजय मिळवले असून, संघ तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित कामगिरी पाहायला मिळत आहे. मात्र, आरसीबीच्या तुलनेत नेट रन रेट कमी असल्याने मुंबईला अव्वल स्थानासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
गुजरात जायंट्सने देखील 3 पैकी 2 सामने जिंकत 4 गुण मिळवले आहेत. मात्र, त्यांचा नेट रन रेट तुलनेने कमी असल्याने गुजरात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांत फक्त आरसीबी, मुंबई आणि गुजरात या तीन संघांनीच विजय मिळवले आहेत.
दुसरीकडे, WPL 2026 च्या चौथ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचे खाते अद्याप उघडलेले नाही. दिल्लीने आपल्या पहिल्या दोन सामन्यांत मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सकडून पराभव पत्करला आहे. तर यूपी वॉरियर्सला गुजरात जायंट्स आणि RCBकडून हार स्वीकारावी लागली आहे.
दरम्यान, बुधवार 14 जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात नवी मुंबईत सामना रंगणार असून, या दोन्ही संघांपैकी एका संघाचे खाते आज उघडण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत स्पर्धेतील 6 सामने खेळले गेले असून, सर्व संघांनी किमान दोन सामने पूर्ण केले आहेत. आगामी सामन्यांत गुणतालिकेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
WPL 2026 गुणतालिका (Points Table)
| संघ | सामने | विजय | पराभव | नो रिजल्ट | गुण | नेट रन रेट |
|---|---|---|---|---|---|---|
| रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु | 2 | 2 | 0 | 0 | 4 | +1.964 |
| मुंबई इंडियन्स | 3 | 2 | 1 | 0 | 4 | +0.901 |
| गुजरात जायंट्स | 3 | 2 | 1 | 0 | 4 | +0.105 |
| दिल्ली कॅपिटल्स | 2 | 0 | 2 | 0 | 0 | -1.350 |
| यूपी वॉरियर्स | 2 | 0 | 2 | 0 | 0 | -2.443 |






