रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने WPL 2026 च्या चौथ्या मोसमात आपली विजयी घोडदौड अधिक भक्कम करत आणखी एक दणदणीत यश मिळवले आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 19 जानेवारी रोजी गुजरात जायंट्स संघावर 61 धावांनी मात करत सलग पाचवा विजय नोंदवला. या विजयासह आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिलीच टीम ठरली आहे.
बडोद्यातील कोटांबी येथील बीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 178 धावांचा मजबूत स्कोअर उभारला. ज्यामध्ये गौतमी नाईकने 73 धावांची सर्वोत्तम खेळी साकारली. कर्णधार स्मृती मानधनाने 26 तर ऋचा घोषने 27 धावांचे मोलाचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत राधा यादवने केलेल्या 17 धावांनी आरसीबीचा स्कोअर आणखी भक्कम झाला.
179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सचा डाव सुरुवातीपासूनच ढासळला. कर्णधार एश्ले गार्डनर वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सोफी डीव्हाईन आणि कनिका आहुजा शून्यावर बाद झाल्या, तर बेथ मुनी, काश्वी गौतम आणि जॉर्जिया वॉरहम दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाहीत. अनुष्का शर्मा (18), भारती फुलमाळी (14) आणि तनुजा कंवर (11) यांनी थोडाफार प्रतिकार केला. गार्डनरने 43 चेंडूत 54 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली, मात्र तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही.
आरसीबीच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली. सायली सातघरे हिने 3 विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजीचा कणा मोडला. नॅडीन डी क्लर्कने 2, तर लॉरेन बेल, राधा यादव आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी एक विकेट घेत विजय निश्चित केला. अखेरीस गुजरातला 20 षटकांत 8 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 117 धावांपर्यंत मजल मारता आली.
या विजयासह आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. सलग पाच विजयांमुळे आरसीबीच्या खात्यात 10 गुण झाले असून त्यांचा नेट रनरेट +1.882 पर्यंत वाढला आहे. WPL 2026 मध्ये आरसीबीचा हा विजयी आत्मविश्वास इतर संघांसाठी निश्चितच धोक्याची घंटा ठरत आहे.






