भारतीय कुस्ती महासंघाने स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहे. 16 ऑगस्टपर्यंत विनेशला या नोटीसला उत्तरे द्यायची आहेत. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान विनेश फोगटवर शिस्तभंगाचे आरोप करण्यात आले होते. यामुळे विनेशला कुस्ती महासंघाने तात्पुरत्या काळासाठी निलंबित केले आहे.
कुस्ती महासंघ ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान विनेशने केलेल्या वर्तनामुळे चांगलेच नाराज झाले आहे. स्पर्धेदरम्यान विनेशने भारतीय खेळाडूंसोबत प्रशिक्षणासाठी नकार दिला होता. मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्याशी देखील तिचे खटके उडाले होते.
कुस्ती महासंघाच्या, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनेशला महासंघाचे प्रमुख ब्रिज भूषण शरण सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आली आहे. अधिकारी म्हणाले, तीन मुद्दे आहेत ज्यावर महासंघाने विनेशकडे उत्तर मागितले आहे. प्रथम, तिने संघ सदस्यांसोबत राहण्यास नकार का दिला? दुसरे, तिने इतर खेळाडूंसोबत प्रशिक्षण का घेतले नाही? तिसरे, तिने भारतीय दलासाठी प्रायोजित केलेल्या ब्रँडची नावे वापरली नाहीत, तर नायकीचा लोगो का वापरला?
अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, “आमचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह खरोखरच तिच्या वागण्यामुळे अस्वस्थ होते. मला वाटते की तिने या सगळ्याऐवजी तिच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिला तात्पुरते निलंबित केले गेले आहे आणि सर्व कुस्ती कार्यातून प्रतिबंधित करण्यात आले आहे. जोपर्यंत ती उत्तर दाखल करत नाही किंवा महासंघ अंतिम निर्णय करत नाही, तोवर ती कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत किंवा इतर घरगुती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही” .
विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची दावेदार म्हणून दाखल झाली होती, पण तिला बेलारूसच्या व्हेनेसा कलाडिन्स्कायाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. विनेश आणि महासंघ समोरासमोर येण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत विनेशने कोविडच्या भीतीचे कारण देत सहभागी होण्यास नकार दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्सवर सर्वात यशस्वी ठरणारे ३ भारतीय गोलंदाज; एकजण आहे सध्याच्या संघात
बाप असावा तर असा! शतक झाल्यानंतर रॉस टेलर मुलीसाठी करतो ‘ही’ गोष्ट; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान