सध्या भारतीय संघातून जवळपास बाहेर गेलेला व निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्याला पश्चिम बंगाल सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘बंग बिभूषण’ पुरस्कार देण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याहस्ते त्याला हा पुरस्कार मिळाला. त्याने ट्विट करत सरकारचे अभिनंदन करत ही बातमी सार्वजनिक केली.
पश्चिम बंगाल सरकारतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना बंग बिभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वर्ष पश्चिम बंगालचे नाव मोठे केल्याबद्दल वृद्धिमान साहा याला हा पुरस्कार दिला गेला. पश्चिम बंगाल सरकारच्या एका कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार सुपूर्द केला गेला.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना वृद्धिमान साहा याने ट्विट केले. या धन्यवादपर ट्विटमध्ये त्याने लिहिले,
“मी माननीय मुख्यमंत्री ममता दीदी बॅनर्जी, पश्चिम बंगाल सरकार व निवड समितीचे मला या पुरस्कारासाठी पात्र समजल्याबद्दल आभार मानतो. हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी स्वतःला गौरवान्वित समजत आहे. मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो.” या पुरस्कारानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू व त्याचा मित्र मनोज तिवारी याने त्याचे अभिनंदन केले.
I am thankful to Hon’ble CM @MamataOfficial Didi, Government of West Bengal and the administration for considering me for this award.I am truly honored to receive this, I extend my heartfelt gratitude. pic.twitter.com/tEimdZPdrE
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) July 25, 2022
शानदार राहिली कारकीर्द
अद्याप निवृत्त न झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने भारतीय संघासाठी २०१० ते २०२१ असे बारा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्याने ४० कसोटीत ३ शतकांसह १३५३ धावा केल्या आहेत. तसेच तो ९ वनडे देखील भारतीय संघासाठी खेळला. सध्या ३७ वर्षांचा असलेला सहा काही दिवसांपूर्वी एका क्रीडा पत्रकाराने धमकी दिल्यामुळे चांगला चर्चेत आला होता. तसेच आपल्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिल्याचे देखील त्याने म्हटले होते. नुकताच त्याने पश्चिम बंगाल सोडून त्रिपुरासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
“माझं करीयर वाचवा”; ऑलिम्पिक विजेत्या लवलिना बोर्गोहेनने फोडली स्वतःवरील अन्यायाला वाचा