जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ भुवया उंचावणाऱ्या प्लेइंग इलेव्हनसह उतरला होता. अंतिम अकरा खेळाडूंमधून आर अश्विन बाहेर होता. तसेच, अक्षर पटेल या फिरकीपटूलाही संधी मिळाली नव्हती. मात्र, मोहम्मद शमी याच्या जागी काही वेळासाठी सब्स्टिट्यूट म्हणून आलेल्या अक्षरने शानदार क्षेत्ररक्षण करत मैफील लुटली. अक्षरने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्क याला भन्नाट पद्धतीने धावबाद करून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
अक्षर पटेलचे शानदार क्षेत्ररक्षण
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील 104व्या षटकात घडली. भारतीय संघाचा शानदार अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झाले असे की, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने 5 धावांवर खेळणाऱ्या मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याला चेंडू टाकताच त्याने मिडऑफच्या दिशेने फटका मारला. तो एक धाव चोरण्यासाठी वेगाने धावला, पण तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेल याने चित्त्याच्या वेगाने चेंडू पकडला. तसेच, त्याने डाव्या हाताने चेंडू उचलत डाईव्ह मारली आणि एका पायावर उभे राहून नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने रॉकेट थ्रो करत स्टम्प्स उडवले. अक्षर डाईव्ह मारताना पडला, पण त्याने चेंडूवरून नजर हटवली नाही. त्याचा हा शानदार थ्रो पाहून भारतीय संघही आनंदी झाला. अशाप्रकारे अक्षर पटेलच्या क्षेत्ररक्षणाने स्टार्कच्या रूपात भारतीय संघाला सातवी विकेट मिळाली. स्टार्क संघाच्या 402 धावांवर बाद झाला.
पहिल्यांदाच घडले ‘असे’
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला बाद केले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने दोन सामन्यातील तीन डावात 9 विकेट्स घेतल्या आहेत.
लंच ब्रेकनंतर ऑस्ट्रेलिया 469 धावांवर सर्वबाद
भारतीय संघाला दुसऱ्या दिवशा चांगली सुरुवात मिळाली. भारताने लंचपूर्वी 4 विकेट्स घेतल्या. 163 धावा करून खेळत असलेल्या ट्रेविस हेडला मोहम्मद सिराज याने केएस भरत याच्या हातून झेलबाद केले. तसेच, 121 धावांवर खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथ याला शार्दुल ठाकूर याने त्रिफळाचीत केले. कॅमरून ग्रीनला मोहम्मद शमी याने शुबमन गिल याच्या हातून झेलबाद केले, तर मिचेल स्टार्क याला अक्षर पटेलने धावबाद केले. यानंतर नियमित अंतराने ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडत राहिल्या. ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट सिराजने घेतली. सिराजने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला अजिंक्य रहाणे याच्या हातून झेलबाद करत तंबूत पाठवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 469 धावांवर संपुष्टात आला.
यावेळी भारताकडून सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, शमी आणि शार्दुल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा यानेही 1 विकेट आपल्या नावावर केली. (wtc final 2023 ind vs aus all rounder axar patel brilliant fielding run out mitchell starc with direct hit see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या ‘या’ निर्णयावर संतापले रवी शास्त्री; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर बोललात गुरुजी’
WTC Final: स्टीव स्मिथचा जलवा कायम; एक नाही दोन नाही तर तब्बल एवढे रेकॉर्ड काढले मोडीत