गेल्या तीन दिवसांपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगला आहे. साउथम्पटन येथे चालू असलेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. परिणामत: अवघ्या २१७ धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत दिवसाखेर २ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान न्यूझीलंडच्या ३५ वर्षीय यष्टीरक्षक बीजे वॅटलिंग याने सामना दर्शकांचे लक्ष वेधले.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. सलामीवीरांच्या भक्कम सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची जोडी मैदानावर तळ ठोकून होती. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ३ बाद १४६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. अशात भारतीय संघ २५० धावांचा आकडा पार करतो की काय? असे दिसत होते.
परंतु न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसननने कर्णधार कोहलीची विकेट घेत सामना फिरवला. त्यानंतर रिषभ पंत, अजिंक्य रहाणेही लवकरच पव्हेलियनला परतले. दोन अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि आर अश्विनही न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे अपयशी ठरले आणि अवघ्या २१७ धावांवर भारतीय संघ गारद झाला.
मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताला एवढ्या कमी धावांवर रोखण्यात गोलंदाजांसह न्यूझीलंडच्या यष्टीरक्षक वॅटलिंगनेही तितकाच हातभार लावला. त्याने डावाच्या सुरुवातीला सलामीवीर शुबमन गिलचा यष्टीमागे अप्रतिम झेल पकडला. याबरोबरच अष्टपैलू रविंद्र जडेजाला ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. याखेरीज त्याने मोठमोठ्या डाईव्ह मारत बरेचसे चौकार अडवले.
वयाची तिशी ओलाडूंनही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात वॅटलिंग जल्लोषाने हवेत कलाबाजी करताना दिसला. सामना चालू असताना टिव्हीवर ग्राफच्या मदतीने त्याच्या यष्टीरक्षणाचे आकडे दाखवले गेले. यामध्ये तो यष्टीच्या दोन्ही बाजूला जवळपास ६.३ मीटरपर्यंतचे मैदान व्यापून चेंडू अडवताना दिसत होता. त्याची हे अद्भुत यष्टीरक्षण पाहून गोलंदाजांसह सामना दर्शकांनीही तोंडात बोटे घातली. त्याच्या यष्टीमागील कलाबीजीची चर्चा सोशल मीडियावर पसंतीचा विषय ठरताना दिसत आहे.
https://twitter.com/man4_cricket/status/1406602912143319043?s=20
https://twitter.com/SketchBuzz1995/status/1406603205648076813?s=20
https://twitter.com/AkshatJ46312287/status/1406711358888890368?s=20
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1406602928211718151?s=20
महत्त्वाचे म्हणजे, हा ऐतिहासिक सामना संपल्यानंतर वॅटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. त्याने या सामन्यापुर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘काय रे, ओरडतोय की विचारतोय’
थोडीशी गंमत! तब्बल ६ फूच ८ इंच उंची असलेल्या काईल जेमिसनची भर सामन्यात चाहत्यांबरोबर मस्ती
आजा नचले! सामना सुरु असतानाच विराट कोहलीला आली नाचण्याची लहर, पाहा व्हिडिओ






