भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा नेहमीच आपल्या फलंदाजीमुळे चर्चेचा विषय बनून असतो. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला शतक झळकावण्यात अपयश आले आहे. विराटने २०१९ मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाही.
आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीला शतक करण्याची उत्तम संधी असणार आहे. तत्पूर्वी, पाकिस्तान संघाच्या माजी कर्णधार सलमान बट्ट याने विराट कोहलीच्या शतकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्ट हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने गेल्या काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंबद्दल अनेक भाष्य केली आहेत. यात आता विराट कोहलीची देखील भर पडली आहे. विराट कोहलीबद्दल बोलताना तो म्हणाला, “विराट कोहली ज्याप्रकारचा फलंदाज आहे. ते पाहता तो शतकापासून जास्तवेळ लांब राहू शकत नाही. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो शतक ठोकू शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “कोहलीने सर्व काही अडथळे मोडले आहेत. कोणाला माहित होते की, इतक्या तरुण वयात विराट कोहलीच्या नावे ३० पेक्षा जास्त शतके असतील. तो फिट आहे आणि चांगली खेळी करत आहे. जर त्याने एखाद्या सामन्यात शतक केले नाही तर, त्याला असे वाटते की त्याने त्या सामन्यात धावा केल्याच नाहीत.”
येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्यात विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. कारण आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात विराट कोहलीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावे एकूण ७० शतक आहेत. यात वनडे क्रिकेटमध्ये त्याने ४३ शतक झळकावले आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला २७ शतक झळकावण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
असा प्रतिभाशाली मुंबईकर, ज्याला भारतीय संघ दूरच आयपीएलमध्येही मिळाली नाही पुरेशी संधी