---Advertisement---

WTC Final, INDvsNZ Day 3: कॉनवेच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंड भक्कम स्थितीत; दिवसाखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा

---Advertisement---

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा रविवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने ४९ षटकात २ बाद १०१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर नाबाद खेळत आहेत.

न्यूझीलंडने ७० धावांवर १ विकेट गमावल्यानंतरही डेवॉन कॉनवेने कर्णधार विलियम्सनच्या मदतीने पुढेही चांगला खेळ कायम केला होता. त्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अफलातून फॉर्म या डावातही कायम ठेवताना अर्धशतक साकारले. त्याने १३७ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर अखेर त्याचा अडथळा भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ४९ व्या षटकात दूर केला. कॉनवेचा झेल मोहम्मद शमीने घेतला. कॉनवेने या डावात १५३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार मारले. तो बाद झाल्याने टेलर फलंदाजीसाठी आला. मात्र, कमी प्रकाशाच्या कारणाने ४९ व्या षटकानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विलियम्सन १२ धावांवर नाबाद खेळत होता. तर टेलर शुन्यावर नाबाद राहिला.

अश्विनने मिळवून दिली पहिली विकेट
रविवारी तिसऱ्या सत्रातही डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांनी आपली चांगली लय कायम राखली होती. त्यांनी भारतीय गोलंदाजांना पहिल्या ३० षटकात कोणतेच यश मिळू न देता काही आक्रमक फटके खेळत अर्धशतकी भागीदारी केली होती. या दोघांची जोडी डोईजड होईल असे वाटत असतानाच अखेर आर अश्विनने ३५ व्या षटकात लॅथमला झेलबाद केले. ३ चौकारांसह ३० धावांवर खेळणारा लॅथम विराटच्या हातात झेल देऊन बाद झाला. लॅथम बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन फलंदाजीसाठी आला आहे. न्यूझीलंडने ३५ षटकात १ बाद ७१ धावा केल्या.

न्यूझीलंडच्या सलामीवारांची सावध सुरुवात
भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपल्यानंतर न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम सलामीला फलंदाजीला उतरले. त्यांनी सावध सुरुवात करताना कोणतेही जोखीम पत्करली नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सुरुवातील विकेट घेण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्राखेर न्यूझीलंडने २१ षटकांत बिनबाद ३६ धावा केल्या.

भारताच्या सर्वबाद २१७ धावा
भारताचा पहिला डाव ९२.१ षटकात २१७ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसन चमकला.

भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने ४४ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रोहित शर्मा ३४, शुबमन गिल २८ आणि आर अश्विनने २२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात ३१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नील वॅग्नर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली.

जेमिसनची भेदक गोलंदाजी
रविवारी भारताने पहिल्या डावात ३ बाद १४६ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. यावेळी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची जोडी नाबाद होती. त्यांनी शनिवारी चांगली फलंदाजी केली असल्याने रविवारी त्यांच्याकडून मोठ्या धावा करण्याच्या अपेक्षा होत्या. मात्र विराट ६८ व्या षटकात काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. विराटने रिव्ह्यू घेतला होता. मात्र, त्यातही तो बाद असल्याचे दिसल्याने भारताला चौथा धक्का बसला. विराटने १३२ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याचे अर्धशतक केवळ ६ धावांनी हुकले.

विराट बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. त्याने रहाणेला चांगली साथ द्यायला सुरुवात केली होती. मात्र, त्यालाही ७४ व्या षटकात जेमिसनने आपल्या जाळ्यात अडकवले. पंत टॉम लॅथमकडे झेल देऊन बाद झाला. त्याने २२ चेंडूत ४ धावा केल्या. त्याच्यानंतर काहीवेळातच रहाणेलाही आपली विकेट गमवावी लागली. नील वॅग्नरने टाकलेल्या डावाच्या ७९ व्या षटकात रहाणेला लॅथमकडे झेल देण्यास भाग पाडले. रहाणेचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. त्याने ११७ चेंडूत ५ चौकारांसह ४९ धावा केल्या.

सध्या आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंची जोडी मैदानावर आली. त्यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अश्विनने ३ चौकारांसह २२ धावा केल्या. पण त्यालाही टीम साऊथीने ८६ व्या षटकात लॅथमकडे झेल देण्यास भाग पाडले. तो बाद झाल्यानंतर जडेजाने जबाबदारी घेत इशांत शर्मासह फलंदाजी करताना पहिल्या सत्राखेरपर्यंत पडझड होऊ दिली नाही.

मात्र, दुसऱ्या सत्रात जेमिसनने इशांतला ४ धावांवर ९२ व्या षटकात बाद केले. त्याच षटकात जसप्रीत बुमराहही पायचीत झाला. अखेर ९३ व्या षटकात जडेजाला १५ धावांवर बाद करत ट्रेंट बोल्टने भारताचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---