आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीतर्फे आयोजित केल्या गेलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा सामना आजपासून म्हणजे १८ जूनपासून सुरु होणार आहे. इंग्लंडमधील साऊथॅम्प्टनच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होणे अपेक्षित होते. मात्र साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने पहिल्या दिवशी एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही.
या सामन्याच्या पहिल्या दिवसातील पहिले आणि दुसरे सत्र रद्द करण्यात आले होते. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस पाऊस थांबल्याने तिन्ही पंच आणि सामनाधिकारी मैदानाचे निरीक्षण करणार होते. त्यावेळी खेळ होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पहिला दिवस रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली. पण त्यामुळे आता सामन्याच्या निकालावर परिणाम होईल, अशी चाहत्यांनी भीती व्यक्त केली. परंतु पावसाने हजेरी लावल्याने आयसीसीने त्यासाठी तयार केलेला राखीव दिवसाचा नियम लागू झाला आहे. ज्यामुळे वाया गेलेल्या सत्रांचा खेळ भरून काढता येईल.
आयसीसीने साऊथॅम्प्टन मधील यापूर्वीच पावसाची भीती लक्षात घेऊन राखीव दिवसाचा नियम लागू केला होता. त्यामुळे १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार असला, तरी आयसीसीने २३ जून हा सहावा दिवस देखील काही वेळ वाया गेल्यास सामन्यासाठी निर्धारित केला होता. आता पहिल्या दिवसाचे दोन सत्र वाया गेल्याने हा नियम लागू झाला आहे. त्यामुळे सहाव्या दिवशी म्हणजेच २३ जूनला देखील आपल्याला हा सामना पाहायला मिळू शकतो.
यातील आनंदाची बाब म्हणजे या तरतुदीमुळे अद्याप सामन्याच्या एकाही षटकाचे नुकसान झाले नाही आहे. परिस्थिती सुधारल्यास संपूर्ण पाच दिवसांचा खेळ होणे, अद्यापही शक्य आहे. त्यामुळे चाहत्यांचे आता साऊथॅम्प्टन मधील पुढील घडामोडींवर लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय महिलांची आश्चर्यकारक घसरगुंडी, १६७ धावांच्या सलामीनंतर २३१ वर आटोपला डाव
वनडे विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा
पृथ्वी शॉच्या बेडवर मिळाली ही वस्तू; चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल