कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनवण्यासाठी आयीसीने 2019 मध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू केली. ज्यालाच काही लोक कसोटी क्रिकेटचा विश्वचषक देखील म्हणतात. गेल्या पाच वर्षांत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने वर्चस्व राखले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 5000 धावांचा टप्पा पार करणारा रूट हा पहिला फलंदाज ठरला आहे.
मुलतान क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रूटने ही कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रुट 32 धावा करून नाबाद परतला. या खेळीत रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रूटच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 59 कसोटी सामन्यांच्या 107 डावांमध्ये 5005 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 51.59 आहे. रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 16 शतके झळकावली आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर नजर टाकली तर टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय रोहित शर्मा आहे. रूट आणि दुसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन यांच्यात धावांचे मोठे अंतर आहे. लॅबुशेनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 3904 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आहे. ज्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 3486 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आहे. ज्याच्या खात्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 3101 धावा आहेत. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कसोटी कर्णधार बाबर आझमचे नाव आहे. ज्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकूण 2755 धावा केल्या आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सध्याच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व येथे दिसून येते. टॉप-10 मध्ये एकूण चार फलंदाज ऑस्ट्रेलियाचे आहेत, तर तीन इंग्लंडचे आणि भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी एक फलंदाज आहेत. सहाव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 2686 धावांसह आहे, तर सातव्या स्थानावर इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राउली आहे. ज्याच्या नावावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2624 धावा आहेत. आठव्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. ज्याने 34 कसोटी सामन्यांच्या 58 डावांमध्ये एकूण 2594 धावा केल्या आहेत. 9व्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने 2558 धावांसह आहे. तर 10व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आहे. ज्याच्या खात्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकूण 2510 धावा आहेत.
हेही वाचा-
शाकिबनंतर आता हा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्तीच्या वाटेवर; भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; कर्णधार हरमनप्रीतच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट समोर
ind vd nz; कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा, अनुभवी खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर, मोठे कारण समोर