भारतीय निवड समितीने टी २० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलला १५ सदस्यीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. त्यानंतर त्याची पत्नी धनश्री वर्माने यावर प्रतिक्रिया दिली आहे. धनश्रीने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने प्रेरक ओळी लिहिल्या आहेत.
संघ निवडीनंतर धनश्रीने केलेली ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. आपल्या पोस्टमध्ये धनश्रीने लिहिले आहे, “आई म्हणते की ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे, नेहमी ताठ मानेने जगा, कारण प्रतिभा आणि चांगली कर्म नेहमी तुमची साथ देतात, त्यामुळे गोष्ट अशी आहे की या वेळेलाही जावेच लागेल. देव महान आहे.” या पोस्ट व्यतिरिक्त, धनश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर चहलसोबत तिचा फोटोही शेअर केला आहे. चहलसोबत शिखर धवनचीही या संघात निवड झालेली नाही.
एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा म्हणाले की, ‘वेगवान चेंडू टाकणाऱ्या फिरकीपटूंना आमचे प्राधान्य होते. म्हणून आम्ही राहुल चाहरची निवड केली.’ चेतन शर्मा असेही म्हणाले की, वरुण चक्रवर्ती हा एक ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणून संघात सामील झाला आहे. तो विरोधी संघासाठी एक ‘सरप्राईज पॅकेज’ ठरेल.
यष्टीरक्षक पर्यायांबाबत शर्मा म्हणाले की, रिषभ पंत पहिल्या क्रमांकासाठी तर ईशान किशन दुसऱ्या क्रमांकासाठी पसंती असेल. संघ व्यवस्थापन केएल राहुलचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करू शकतो. भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीबाबत चेतन शर्मा म्हणाले की, ‘रोहित शर्मा आणि केएल राहुल याशिवाय ईशान किशन देखील सलामीला करू शकतो. याशिवाय हार्दिक पांड्या प्रत्येक सामन्यात त्याच्या षटकांचा कोटा पूर्ण करेल.’
टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे हे उल्लेखनीय आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत, येत्या २४ ऑक्टोबर पासून सुरुवात करायची आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा खेळाडूंना होऊ शकतो.
विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या पाच दिवस आधीपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात. आयपीएलमधील कामगिरीनंतर नवीन नावांना संधी मिळते का हे पाहावे लागेल. टी २० विश्वचषकात भारताचा संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
पाचव्या कसोटीत येणार पावसाचा अडथळा? वाचा हवामानाचा अंदाज
सीपीएलमध्ये ३९ वर्षीय खेळाडूने बाउंड्री लाईनजवळ उडी मारुन घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
‘तो खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यात संघात यायलाच हवा’, गावसकरांचा सल्ला