---Advertisement---

काय भारी योगायोग आहे! युवा विश्वविजेते ते पदार्पणातील शतक, धूल आणि शॉ यांच्यात आढळले ‘हे’ साम्य

On: गुरूवार, फेब्रुवारी 17, 2022 5:03 PM
---Advertisement---

भारतातील मानाची मानल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला (Ranji Trophy) गुरुवारपासून (१७ फेब्रुवारी) सुरुवात झाली. या स्पर्धेत दिल्ली संघाचा पहिला सामना तमिळनाडू संघाशी होत आहे. गुवाहाटी येथे होत असलेल्या या सामन्यातून युवा यश धूल याने (Yash Dhull) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण (First Class Debut) केले आहे. विशेष म्हणजे त्याने पदार्पण करताना शतकही केले. त्यामुळे त्याच्यात आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या बाबतीत मोठे योगायोग घडून आल्याचे दिसून येत आहे. 

धूल हा नुकताच कर्णधार म्हणून १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) जिंकला आहे. त्यामुळे तो बराच चर्चेत देखील होता. त्यातच आता त्याने पदार्पणाच्या रणजी सामन्यात शतकी खेळी करत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.

गुरुवारपासून सुरू झालेल्या रणजी सामन्यात धूल दिल्लीकडून सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने खेळायला आल्यानंतर दबाव न घेता फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी पहिल्या तीन षटकातच २ विकेट्स गमावल्या होत्या. पण असे असतानाही धूलने पहिल्यांदा नितीश राणा आणि नंतर जाँटी सिद्धू यांना साथीला घेत शतकी खेळी केली.

त्याने राणाबरोबर ६० धावांची आणि जाँटीबरोबर ११९ धावांची भागीदारी रचली. याबरोबरच वैयक्तिक ११३ धावांची शतकी खेळी केली. ही खेळी करताना त्याला ९७ धावांवर असताना नो बॉल पडल्यामुळे जीवदान मिळाले होते. त्याने ही खेळी १५० चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने केली.

धूल आणि शॉ यांच्यामध्ये योगायोग
धूलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केल्याने त्याची तुलना पृथ्वी शॉबरोबर होत आहे. कारण, या दोघांच्याही कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समानता दिसून आली आहे. धूलप्रमाणेच पृथ्वी शॉ याने देखील जानेवारी २०१७ मध्ये तमिळनाडू विरुद्धच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शॉने पदार्पणाच्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये शतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १२० धावांची शतकी खेळी केली होती.

विशेष म्हणजे धूलप्रमाणेच शॉ याला देखील ९९ धावांवर असताना नो बॉलवर जीवदान मिळाले होते. इतकंच नाही, तर धूल आणि शॉ हे दोघेही १९ वर्षांखालील विश्वविजेते कर्णधार आहेत आणि दोघांनाही हा विश्वचषक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलसाठी आपल्या संघात घेतले होते.

शॉ याने कर्णधार म्हणून २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आणि नंतर तो आयपीएलमध्ये दिल्ली संघात सामील झाला. धूलने देखील कर्णधार म्हणून नुकताच वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेला १९ वर्षांखालील विश्वचषक कर्णधार म्हणून जिंकला. तसेच त्यानंतर त्याला आयपीएल २०२२ साठी दिल्ली संघाने लिलावात ५० लाख रुपयांना विकत घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नवी आयसीसी क्रमवारी| विराट-बाबरसह हेजलवूडही ‘त्या’ खास यादीत सामील

‘वर्ल्डकप हिरो’ राज बावाची रणजी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर कमाल

रवी बिश्नोईसाठी टी२० पदार्पण राहिले खास! सामनावीर ठरल्यावर दिली मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---