चीन येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत मंगळवारी (3 ऑक्टोबर) उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार सलामीवीर यशस्वी जयस्वाल ठरला. त्याने या सामन्यात शानदार शतक झळकावले. या सोबतच त्याने आपल्या छोट्याशा मात्र शानदार करिअरमध्ये चार चांद लावले.
इतर फलंदाज संघर्ष करत असताना यशस्वी याने या सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. त्याने आठ चौकार व सात षटकारांच्या मदतीने 49 चेंडूत शतकीय खेळी केली. यासोबतच भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावे जमा झाला. यापूर्वी हा विक्रम शुबमन गिल याच्या नावे होता.
यशस्वी याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास दिसून येते की तो मोठ्या सामन्यांमध्ये नेहमी चमकताना दिसला आहे. केवळ एकवीस वर्षाच्या असलेल्या यशस्वी याच्या नावे प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेट अशा दोन्ही ठिकाणी दुहेरी शतके जमा आहेत. याशिवाय भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफी या सर्व स्पर्धांमध्ये त्याच्या बॅटमधून शतके आली आहेत.
त्याने इंडिया ए संघासाठी देखील शतक करण्याचा कारनामा केला. याशिवाय अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत देखील त्याच्या बॅटमधून शतक आलेले. यावर्षी आयपीएलमध्ये देखील त्याने शतक झळकावले. त्यानंतर भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण करताना त्याने दीड शतकी खेळी केली. त्यानंतर आता एशियन गेम्समध्ये देखील त्याच्या नावे शतक जमा झाले आहे.
(Yashasvi Jaiswal Incredible Career Hits Century At Every Major Tournaments)
हेही वाचा-
जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी






