भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. यानंतर भारतातीलच नाही तर भारताबाहेरीलही अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी धोनीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टनेही धोनीबद्दल सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले आहे की ‘तूझ्या विरुद्ध खेळताना नेहमीच आनंद झाला. तू हे केले तेही तूझ्या शैलीत आणि विशेष म्हणजे शांततेतच. तूझ्याच शैलीमध्ये. धोनी शैलीत. तू जे यश मिळवलेस त्याबद्दल अभिनंदन.’
Always a pleasure to play against you @msdhoni You did it with style, flamboyance and above all else, calmness. Your own way. The Dhoni way. Congrats on all you achieved. https://t.co/K9zfx2VLmF
— Adam Gilchrist (@gilly381) August 15, 2020
धोनी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला, त्यानंतर त्याची अनेकदा गिलख्रिस्टबरोबर तुलना झाली आहे. गिलख्रिस्ट आणि धोनी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षकांपैकी एक आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ८२९ विकेट्स घेतल्या आहेत. तर गिलख्रिस्टने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ९०५ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये धोनी आणि गिलख्रिस्टच्या पुढे केवळ मार्क बाऊचर असून त्यांनी ९९८ विकेट्स घेतल्या आहेत.