आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, सर्व संघ आपल्या तयारीवर अखेरचा हात फिरवत आहेत. तीन वेळा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू देखील मैदानावर चांगलाच घाम गाळत आहेत. त्याचवेळी अनुभवी भारतीय फलंदाज व चेन्नई संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पा याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीबाबबत एक मोठा खुलासा केला आहे.
उथप्पाचा धोनीबाबत खुलासा
आयपीएल २०२१ च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करून उथप्पाला चेन्नई संघात समाविष्ट केले गेले होते. त्या वेळचा अनुभव उथप्पाने एका मुलाखतीत सांगितला. तो म्हणाला, “ज्यावेळी मी चेन्नई संघात सामील झालो, त्यावेळी धोनीसह सर्व खेळाडूंनी माझे स्वागत केले. मात्र, धोनीने पहिल्याच भेटीत मला सांगितले की, तुझा संघात समावेश करण्यात माझा काहीही सहभाग नव्हता. पुढे जाउन उगीच मला या गोष्टीचे श्रेय घ्यायचे नाही.”
उथप्पाने पुढे सांगितले, “स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धोनी मला म्हणाला होता की, तुला संघात समाविष्ट केले आहे, म्हणजे तुला लगेच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. आपल्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे सध्या चांगली कामगिरी करत आहेत. स्पर्धा पुढे गेल्यावर तुझ्या स्थानावर विचार केला जाऊ शकतो.”
सध्या चेन्नई संघात ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस हे सलामीवीराची भूमिका पार पाडत आहेत. मात्र, प्लेसिस दुखापतग्रस्त असल्याने उथप्पाला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात संधी मिळू शकते. भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात तो एकही सामना खेळू शकला नव्हता.
पहिल्याच सामन्यात भिडणार परंपरागत प्रतिस्पर्धी
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिला सामना परंपरागत प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान १९ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळला जाईल. भारतात झालेल्या आयपीएलच्या पूर्वार्धात मुंबईने अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला होता. सध्या चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या तर, मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट कोहली आणि रवी शास्त्री कसोटी क्रिकेटचे उत्तम समर्थक आणि प्रचारक’, ऑसी दिग्गजाकडून कौतुक
दिल्ली कॅपिटल्सला धक्का! ‘हा’ फिरकीपटू आयपीएल २०२१ मधून पडला बाहेर, सरावादरम्यान झाली दुखापत