---Advertisement---

जेव्हा विक्रमांच्या यादीत १६ वर्षीय सचिननंतर २० वर्षीय पृथ्वी शाॅ येतो

On: शनिवार, फेब्रुवारी 29, 2020 10:57 AM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। आजपासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 63 षटकात 242 धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (54), चेतेश्वर पुजारा(54) आणि हनुमा विहारीने(55) अर्धशतकी खेळी केल्या.

शॉने ही अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच एक खास विक्रमही केला आहे. शॉने आज 8 चौकार आणि 1 षटकारासह 64 चेंडूत 54 धावांची खेळी केली. हे त्याचे न्यूझीलंडमध्ये कसोटीतील पहिलेच अर्धशतक आहे.

त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये कसोटीत अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. शॉने आज 20 वर्षे 112 दिवस एवढे वय असताना हे अर्धशतक केले.

न्यूझीलंडमध्ये भारताकडून सर्वात कमी वयात कसोटीत अर्धशतक करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने 16 वर्षे 291 दिवस एवढे वय असताना न्यूझीलंडमध्ये पहिले कसोटी अर्धशतक केले होते. त्याने 1990 ला नेपियर येथे झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 88 धावांची खेळी केली होती.

आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात शॉ, पुजारा आणि विहारी व्यतिरिक्त अन्य भारतीय फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. या तिघांव्यतिरिक्त केवळ रिषभ पंत(12), मोहम्मद शमी(16) आणि जसप्रीत बुमराह(10) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नील वॅगनरने 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडमध्ये कसोटीत अर्धशतक करणारे सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटू –

16 वर्षे 291 दिवस – सचिन तेंडूलकर (नेपियर, 1990)

20 वर्षे 112 दिवस – पृथ्वी शॉ (क्राईस्टचर्च, 2020)

21 वर्षे 336 दिवस – अतुल वासन (ऑकलंड,1990)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---