सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतानं शानदार पुनरागमन केलं. तिसऱ्या दिवशी युवा स्टार अष्टपैलू नितीश रेड्डी याच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं फॉलोऑन पुढे ढकलला आहे.
हैदराबादच्या नितीश रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच मालिकेत जबरदस्त कामगिरी केली असून मेलबर्नमध्ये त्यानं वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी शतक झळकावलं. यासोबतच नितीशनं अनेक विक्रम केले. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतासाठी शतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. चला तर मग, या लेखात आम्ही तुम्हाला अशा 3 भारतीय फलंदाजांबद्दल सांगतो, ज्यांनी सर्वात कमी वयात ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी शतक झळकावलंय.
(3) नितीश रेड्डी (2024) (21 वर्षे, 216 दिवस) – युवा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शानदार शतक झळकावलं. या प्रतिभावान खेळाडूनं बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतासाठी एकट्यानं लढा दिला. या सामन्यात त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक केवळ 171 चेंडूत पूर्ण केलं. तो 21 वर्ष 216 दिवस वयात ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणार तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.
(2) रिषभ पंत (2019) (21 वर्षे, 92 दिवस) – सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची बॅट काहीशी शांत आहे. पण या डावखुऱ्या फलंदाजानं ऑस्ट्रेलियात यापूर्वी धमाल केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच दौऱ्यात त्यानं अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानं 2019 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 189 चेंडूत 159 धावा केल्या होत्या. तेव्हा त्याचं वय 21 वर्ष आणि 92 दिवस होतं. ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज आहे.
(1) सचिन तेंडुलकर (1992) (18 वर्षे, 256 दिवस) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘विक्रमादित्य’ म्हटलं जातं. त्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. तो ऑस्ट्रेलियात सर्वात कमी वयात शतक झळकावणार भारतीय आहे. 1992 मध्ये सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यानं नाबाद 148 धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो वयाच्या 18 वर्ष 256 दिवसांत कांगारु भूमीवर शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय होता. त्याचा हा रेकॉर्ड 32 वर्षांनंतरही कायम आहे.
हेही वाचा –
नितीश आणि वॉशिंग्टनने रचला विक्रम, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं
पोराला क्रिकेटर बनवण्यासाठी बापाने नोकरी सोडली! जाणून घ्या नितीश रेड्डीचा अंडर-14 पासून मेलबर्नपर्यंतचा प्रवास
MCG मध्ये नितीश रेड्डीचा फिल्मी अवतार, ‘पुष्पा’ नंतर ‘बाहुबली’ सेलिब्रेशन; पाहा VIDEO