गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून संघात काही बदल घडले आहेत. गंभीरची पहिली असाइनमेंट श्रीलंका दौरा होती, जिथे टीम इंडियानं टी20 मालिका जिंकली, मात्र एकदिवसीय मालिकेत संघाला पराभव पत्कारावा लागला. आता मेन इन ब्लूची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे. बांगलादेशचा संघ 2 सामन्यांच्या कसोटी आणि 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेसाठी गौतम गंभीरनं एक नवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज शोधला, जो भारतीय संघासोबत दिसणार आहे.
वास्तविक, गंभीरचा हा नवीन शोध म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज युधवीर सिंह आहे. ‘केस्पोर्ट्स वॉच’च्या रिपोर्टनुसार, युधवीर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेट बॉलर म्हणून टीम इंडियामध्ये सामील होईल. 140-145 च्या वेगाने गोलंदाजी करणारा युधवीर सरावादरम्यान टीम इंडियासाठी महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. याशिवाय त्याला स्वत:ला सिद्ध करण्याचीही चांगली संधी मिळणार आहे.
या अहवालात एका सूत्राचा हवाला देत म्हटलं आहे की, “काल युधवीरला कॉल आला आणि त्याला 12 सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आलं. ही त्याच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे.”
26 वर्षीय युधवीरनं आतापर्यंत लखनऊसाठी पाच सामने खेळले. त्याला 2023 मध्ये 3 आणि 2024 मध्ये 2 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या 5 सामन्यात त्यानं 4 विकेट घेतल्या. तो जम्मू-काश्मीरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. युधवीरनं आतापर्यंत केवळ 4 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 3 विकेट घेतल्या. याशिवाय त्यानं फलंदाजीत 79 धावा केल्या आहेत. त्यानं 12 लिस्ट ए आणि 20 टी20 सामने खेळले आहेत. त्यानं लिस्ट ए मध्ये 12 आणि टी20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा –
IND VS BAN; श्रेयस अय्यरची सुट्टी; पंत-कोहलीचे पुनरागमन, पाहा संघाबाबत मोठे वैशिष्ट्ये
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचला, मागील सर्व रेकॉर्ड मोडीत!
‘संधीचं सोनं झालं’, प्रतिभावान खेळाडूची टीम इंडियामध्ये निवड; एकेकाळी करिअर धोक्यात होतं!