आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. रविवारी (२४ ऑक्टोबर) झालेल्या सुपर १२ फेरीतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहते भलतेच चिडले आहेत. तसेच या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मोहम्मद शमीवर ऑनलाईन अटॅक केला जात आहे. ज्यामुळे अनेक दिग्गजांनी त्याचे पुढे येऊन समर्थन केले आहे. या प्रकरणात युसुफ पठाणने देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे.
अबूधाबी टी१० स्पर्धेच्या वेळी एका ऑनलाईन चर्चासत्रात बोलताना युसुफ पठाण म्हणाला की, “मी म्हटल्याप्रमाणे, कोणताही क्रिकेट संघ किंवा क्रिकेटपटू सामना गमावण्याचा विचार करत नाही. आम्ही १०० टक्के प्रयत्न करत असतो. एक चाहता म्हणून मी इतकच म्हणेल की, हा एक सामना होता, ही स्पर्धेची सुरुवात होती. चाहते म्हणून आपण संघाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपल्या संघाला पाठिंबा देण्याची गरज आहे. पाकिस्तानकडून पराभूत व्हायला आपल्याला २९ वर्षे लागली.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “त्या १५ खेळाडूंना समर्थन करण्याची गरज आहे ज्यांची विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना समर्थन करून आपण त्यांना खात्री पटवून दिली पाहिजे की, आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. जेव्हा संघ जिंकतो त्यावेळी त्यांचे भरपूर कौतुक होते. परंतु ज्यावेळी संघ पराभूत होतो, त्यावेळी देखील त्यांना समर्थन केले पाहिजे.”
तसेच विश्वचषक स्पर्धा जिंकण्याबाबत पठाण म्हणाला की, “भारतीय संघ चांगली कामगिरी करेल. हा स्पर्धेतील पहिलाच सामना होता. आणखी सामने खेळले जाणार आहेत.आपण विश्वचषक स्पर्धा देखील जिंकू शकतो. ”
हार्दिक पंड्याची निवड झाल्याबाबत विचारले असता, युसुफ पठाण म्हणाला की, “मला नाही माहित की, संघ व्यवस्थापन काय विचार करत आहे. जर एखादा खेळाडू फिट नसेल तर त्याचे संघात स्थान बनत नाही. अष्टपैलू खेळाडू संघासाठी मोलाची भूमिका पार पाडत असतो. त्याची जागा घेण्यासाठी भरपूर खेळाडू आहेत. जसे की ईशान किशन, शार्दुल ठाकूर. हार्दिक पंड्याबद्दल त्यांना काय वाटते हे संघ व्यवस्थापनच सांगेल.”