रविवारी (२१ मार्च) पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ च्या भारत लीजेंड़्स आणि श्रीलंका लीजेंड़्स यांच्यातील रोमहर्षक अंतिम सामन्यात भारत लीजेंड़्सने १४ धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज चषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात ३६ चेंडूत नाबाद ६२ धावा आणि २ गडी बाद करणाऱ्या युसुफ पठाणला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारताना त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त करत, आपला भाऊ इरफान पठाणबद्दल विधान केले आहे.
इरफान पठाण आणि युसुफ पठाण या भावांनी भारतीय संघासाठी देखील भरपूर क्रिकेट खेळले आहे. या दोघांनीही भारतीय संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मध्ये भारतीय लीजेंड़्स संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर इरफानबद्दल बोलतांना युसुफ म्हणाला, “माझ्या भावासोबत मी या खेळाचा खूप आनंद घेतला.”
इरफानने वेस्ट इंडिज लीजेंड्स संघाविरुद्ध झालेल्या सेमी फायनल सामन्यात निर्णायक षटक फेकत भारतीय संघाला सामना जिंकवून दिला होता.
युसुफने सावरला संघाचा डगमगता डाव
अंतिम सामन्यात श्रीलंकन लीजेंड़्स संघाने नाणेफेक जिंकून भारतीय लीजेंड़्स संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाकडून सलामी फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर युवराज सिंग याने ६० धावांची आक्रमक खेळी केली. तसेच युसुफ पठाण याने ५ षटकार आणि ४ चौकार लगावत ६२ धावांची खेळी केली. यासोबतच त्याने २ गडी देखील बाद केले होते. हा सामना भारतीय संघाने १४ धावांनी जिंकला.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर युसुफ पुढे म्हणाला, “रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळण्याचा अनुभव खूप चांगला होता. निवृत्ती घेतल्यानंतर ही माझी पहिलीच क्रिकेट स्पर्धा होती. मला आनंद आहे की आम्ही विजय संपादन केले. गेल्या ३ सामन्यात आम्ही जे क्रिकेट खेळलोय ते उल्लेखनीय आहे. युवराज ज्याप्रकारे चेंडूला मारत होता ते अप्रतिम होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”
विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’
पुणेरी पाहुणचार! वनडेसाठी पुण्यात आलेली टीम इंडिया ‘या’ अलिशान हॉटेलमध्ये करतेय विश्रांती