इंग्लंडच्या मैदानावर टीम इंडियाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) जबरदस्त कामगिरी केली आहे. 3 सामन्यांत 14 वर्षीय या खेळाडूने आतापर्यंत 179 धावा केल्या आहेत. तिसऱ्या यूथ वनडे सामन्यात त्याने फक्त 31 चेंडूंमध्ये 86 धावांची विस्फोटक खेळी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या डावादरम्यान त्याने चौकारांपेक्षा जास्त षटकार ठोकले असून, केवळ 20 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. या दमदार खेळीसह वैभवने युवराज सिंग (Yuvraj Singh & Suresh Raina) आणि सुरेश रैनाचा विक्रमही मागे टाकला आहे. उर्वरित दोन सामन्यांमध्ये आता त्याचे लक्ष्य 12 वर्ष जुना विक्रम मोडण्यावर असेल.
तिसऱ्या यूथ वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशी पूर्णपणे इंग्लंड गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. वैभवने आक्रमक शैलीत फलंदाजी करत आपलं अर्धशतक फक्त 20 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. 31 चेंडूंच्या या डावात 14 वर्षांच्या या खेळाडूने चौकार-षटकारांचा वर्षाव केला. 277 च्या चांगल्या स्ट्राईक रेटने त्याने युवराज सिंग आणि सुरेश रैनाचा विक्रम मोडला. भारताकडून अंडर-19 मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटने 50 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज तो ठरला आहे. युवराजने 2000 साली 232 स्ट्राईक रेटने 25 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या होत्या. तर रैनाने 2004 मध्ये 236 स्ट्राईक रेटने 38 चेंडूंमध्ये 90 धावा फटकावल्या होत्या.
आता उरलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये वैभवचे लक्ष 12 वर्ष जुना विक्रम मोडण्यावर असेल. मात्र त्यासाठी त्याला शतकी खेळी करावी लागेल. तसेच भारताकडून अंडर-19 मध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा विक्रम सध्या सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) नावावर आहे. सरफराजने 2013 मध्ये फक्त 15 वर्ष 338 दिवसांच्या वयात शतक ठोकलं होतं. आता जर वैभव शतक झळकवण्यात यशस्वी झाला, तर तो सरफराजला मागे टाकून सर्वात लहान वयात शतक करणारा फलंदाज ठरेल.