भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडू झाले आहेत. त्यापैकी एक नाव युवराज सिंगचे देखील आहे. टीम इंडियाचा सर्वात मोठा चॅम्पियन खेळाडू युवराज सिंग आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंगचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगडमध्ये झाला. त्याने 2000 मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि सुमारे 17 वर्षे त्याने भारताचे प्रतीनिधित्व केले.
युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. युवराजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अश्या पाच मोठ्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत. जे आज ही त्याच्या नावे आहेत.
5. आयपीएलच्या एका आवृत्तीत 2 हॅट्ट्रिक घेणारा एकमेव भारतीय
युवराज सिंगचे नाव केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यातही तो शानदार कामगिरी केला आहे. आयपीएलमध्ये त्याने 2 हॅट्ट्रिक्स आपल्या नावावर केल्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंजाब किंग्ज (पूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब) कडून खेळताना त्याने 2009 च्या मोसमात 2 हॅटट्रिक्स घेतल्या. एकाच मोसमात 2 हॅट्ट्रिक घेणारा तो भारताचा एकमेव गोलंदाज आहे.
4. 3 आयसीसी स्पर्धांतील बाद फेरीतील सामनावीर
कोणत्याही खेळाडूसाठी आयसीसी स्पर्धेत कामगिरी करणे खूप खास असते. युवराज सिंगने आयसीसीच्या बाद फेरीत भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. तो 3 आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत सामनावीर ठरला आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफी, एकदिवसीय विश्वचषक आणि टी20 विश्वचषकातील बाद फेरीत सामनावीर ठरला आहे.
3. वनडे फॉरमॅटमध्ये 5व्या क्रमांकावर भारतासाठी सर्वाधिक शतके
टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग हा भारतासाठी एक जबरदस्त मधल्या फळीतील फलंदाज होता. विशेषत: त्याने पाचव्या क्रमांकावर खूप चांगले योगदान दिले. टीम इंडियासाठी अनेक ऐतिहासिक खेळी खेळणाऱ्या युवराज सिंगने पाचव्या क्रमांकावर शानदार फलंदाजी करत 7 शतके झळकावली. भारतासाठी पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक शतके झळकावणारा तो फलंदाज आहे.
2. भारतासाठी 6 चेंडूत 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज
युवराज सिंगने 6 चेंडूत मारलेले ते 6 षटकार क्वचितच कोणी विसरेल. हे दृश्य प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात व मनात घर करून राहिले. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारून इतिहास रचला होता.
1.भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक
भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात जलद आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. या फलंदाजाने 2007 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध एक अप्रतिम खेळी खेळली आणि केवळ 12 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यावेळी हे अर्धशतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकूण इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक होते. पण नंतर हा विक्रम नेपाळच्या दीपेंद्र सिंग ऐरीने 9 चेंडूत अर्धशतक ठोकून मोडला.
हेही वाचा-
या 3 कारणांमुळे अजिंक्य रहाणे आयपीएल 2025 मध्ये केकेआरचे नेतृत्व करु शकतो
IND vs AUS: ब्रिस्बेन कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी सुखद बातमी, स्टार खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त
ZIM VS AFG; झिम्बाब्वेचा वरचढ, रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव!