युवराज सिंग हा २०१९ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी दावेदार खेळाडू नसल्याचं म्हणणं आहे बीसीसीआय मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं.
काल श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात भारताच्या दोन अनुभवी खेळाडू युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना डच्चू देण्यात आला तर एमएस धोनीला संधी देण्यात आली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील फॉर्म हाच युवराजला संघाबाहेर फेकण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. गेल्या ६ डावात भारताच्या या ३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळलेल्या खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही.
बीसीसीआय मधील एका वरिष्ठ अधिकाराच्या नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की युवराज क्षेत्रररक्षण आणि फलंदाजी या दोनही विभागात चांगली कामगिरी करत नाही. तो २०१९ च्या विश्वचषकातील प्रबल दावेदार नाही. युवराज सिंगची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू रांगेत उभे आहेत.
धोनी बाबतीत मात्र तसे नाही. ह्या खेळाडूच्या जागी कुणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे. धोनीची जागा घेईल असा खेळाडू सध्यातरी नाही. असेही हा अधिकारी पुढे म्हणाला.
जागतिक क्रिकेटमध्ये सध्या खेळत असलेला युवराज हा सर्वात अनुभवी आणि जेष्ठ खेळाडू आहे. त्याने ३०४ एकदिवसीय सामन्यात ८७०१ धावा केल्या आहेत. बीसीसीआयने युवराजला संघातून वगळून एकप्रकारे स्पष्ट संकेतच दिले आहेत.