भारताचा फायटर क्रिकेटपटू युवराज सिंगने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराज हा नेहमीच मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला गेला आहे. त्याचा १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातून सुरु झालेला खडतर प्रवास १९ वर्षांनंतर आज थांबत आहे.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे द्वारा ३ ऑक्टोबर २००० रोजी पदार्पण केले. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. परंतु केनियाविरुद्ध त्याला ४ षटकं गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. वनडेत तो शेवटचा सामना ३० जून २०१७ रोजी विंडीजविरुद्ध ऑंटीगा येथे खेळला. यात त्याने ३९ धावा केल्या होत्या. वनडेत युवराजने ३०४ सामन्यात ३६.५६च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या तसेच १११ विकेट्सदेखील घेतल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये युवराजला आपले संघातील स्थान कधीही पक्के करता आले नाही. परंतु तरीही तो जवळपास ४० सामने खेळला. यात त्याने ३३.९३च्या सरासरीने १९०० धावा केल्या. तो शेवटचा कसोटी सामना ५ डिसेंबर २०१२ ला इंग्लंडविरुद्ध खेळला.
टी२०मध्ये युवराजने मात्र चमकदार कामगिरी केली. तसेच त्याच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर संघाने २००७मध्ये टी२०चे विश्वविजेतेपदही जिंकले होते. युवराजने २००७ ते २०१७ या काळात ५८ टी२० सामन्यात ११७७ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या होत्या.