सचिन तेंडुलकर हे नाव घेतले तरी, अनेकांसमोर त्याच्या अनेक खेळी उभ्या राहातात. त्यात त्याने २९ मार्च २००४ रोजी पाकिस्तानविरुद्ध केलेली नाबाद १९४ धावांची खेळीही अनेकांना आठवते. त्याच्या या खेळीची चर्चाही बरीच होत असते. त्याला कारण असे की त्यावेळी मुलतान कसोटीत तो जेव्हा १९४ धावांवर खेळत होता, तेव्हा भारताचा कर्णधार असलेल्या राहुल द्रविडने संघाचा डाव घोषित केला होता. त्यामुळे सचिनची द्विशतकाची संधी हुकली होती. आता याबद्दल युवराज सिंगने मोठे भाष्य केले आहे.
मुलतान कसोटीत (Multan Test) विरेंद्र सेहवागने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्रिशतक झळकावले होते. त्यानंतर सचिनही (Sachin Tendulkar) द्विशतकाकडे मार्गस्त होत होता. त्याला युवराज सिंगची (Yuvraj Singh) चांगली साथ मिळाली होती. पण, युवराज अर्धशतक करून बाद झाला आणि त्याचवेळी राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारताचा डाव घोषित केला. त्यामुळे १९४ धावांवर खेळत (Not out 194 Runs) असलेला सचिन मान खाली घालून निराश होत पॅव्हेलियनकडे परतताना दिसला होता. त्यानंतर द्रविडवर बरिच टीका झाली होती. पण, द्रविडने त्यावेळी संघहित जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते.
आता या घटनेबद्दल १७ वर्षांनी युवराजने भाष्य केले आहे. स्पोर्ट्स १८ शी बोलताना तो म्हणाला, ‘आम्ही फलंदाजी करत असताना आम्हाला संदेश मिळाला होता की, आक्रमक खेळ करा आपल्याला डाव घोषित करायचा आहे. त्याने एकाच षटकात ६ धावा पूर्ण केल्या असत्या. आम्ही त्यानंतर (डाव घोषित केल्यानंतर) ८-१० षटके गोलंदाजी केली. मला वाटत नाही की, एक-दोन षटकांनी फार फरक पडला असता.’
युवराज पुढे म्हणाला, ‘जर हा तिसरा किंवा चौथा दिवस असता, तर तुम्ही संघाला प्राधान्य देता आणि ते जेव्हा तुम्ही १५० धावांवर होता तेव्हा घोषिक करू शकले असते. विचारांमध्ये फरक असू शकतो. मला वाटते की संघाने त्याचे २०० झाल्यावर डाव घोषित करायला हवा होता.
स्वत:च्या कारकिर्दीबद्दलही बोलला युवराज
२००४ च्याच पाकिस्तान दौऱ्यात युवराजने मुलतान कसोटीनंतर झालेल्या लाहोर कसोटीत शतक झशकावले होते. तसेच त्या कसोटी मालिकेत २०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. पण असे असले तरी युवराजची कसोटी कारकिर्द ४० सामन्यांपूरतीच मर्यादीत राहिली. त्याला कसोटीत फार जास्त संधी मिळाली नाही.
याबद्दल बोलताना युवराज म्हणाला, ‘जर तुम्ही सध्याच्या काळाची त्या काळाशी तुलना केली, तर तुम्ही पाहाल की खेळाडूंना १०-१५ सामनेच मिळतात. त्यावेळी मधली फळी खूप मजबूत होती. त्यावेळी विरेंद्र सेहवाग सलामीला फलंदाजी करत होता आणि नंतर द्रविड, सचिन, गांगुली, लक्ष्मण यायचे. मी लाहोरमध्ये शतक केले होते आणि पुढच्याच कसोटीत मला सलामीला फलंदाजी करण्यास सांगितले होते.’
याबरोबरच युवराजने हे देखील मान्य केले की तो अर्धशतकांचे शतकात रुपांतर करण्यास अनेकदा अपयशी ठरला. तो म्हणाला, त्याने प्रयत्न केले पण, कदाचीत जास्त कसोटी कारकिर्द त्याच्या नशीबात नव्हती. युवराजने ४० कसोटीत ३ शतके आणि ११ अर्धशतकांसह १९०० धावा केल्या. तसेच ९ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगावे लागले’, पराभवानंतर हार्दिक पंड्याने सांगितली कुठे झाली चूक
लखनऊने जिंकली मनं! आईच्या सन्मानासाठी खेळाडू खास जर्सीसह उतरणार पुण्याच्या मैदानात